अ‍ॅपशहर

करोना: चीनची मोठी घोषणा; 'या' महिन्यात सर्वांसाठी लस उपलब्ध होणार!

Coronavirus vaccine news:करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची प्रतिक्षा करणाऱ्या जगाला चीनने मोठा दिलासा दिला आहे. चीनने विकसित केलेल्या तिन्ही लशींचे चाचणीतील परिणाम अतिशय सकारात्मक आले असून नोव्हेंबर महिन्यात ही लस सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2020, 10:09 am
बीजिंग: करोना संसर्गाच्या थैमानामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाने सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्याची घोषणा केल्यानंतर आता चीनने ही मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपासून सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देणार असल्याचे चीनने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vaccine (file photo)
नोव्हेंबरपासून सर्वांसाठी लस उपलब्ध होणार!


चीनच्या चायना सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने (सीडीसी) याबाबतची माहिती दिली. करोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. आम्ही यशापासून अवघे काही पावले दूर आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही ही लस सर्वसामान्यजणांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचेही सीडीसीने साांगितले आहे. चीनच्या तीन लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या लशींच्या आधीच्या चाचणीच्या टप्प्यातील परिणाम अतिशय चांगले आले आहेत. या तिन्ही लशींचा वापर अत्यावश्यक सेवेशी निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आला होता. त्यांना कोणताही त्रास झाला असल्याचे समोर आले नाही. त्याशिवाय या लशी अतिशय परिणामकारक असल्याचे समोर आले आहे.

वाचा: रशिया, चीननंतर 'या' देशाने दिली लस वापराला मंजुरी

सीडीसीचे प्रमुख गुईझेन वू यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात ही लस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मी स्वत: देखील ही लस टोचून घेतली असून मला कोणताही त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या तिन्ही लशी चीनच्या नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुप (सीनोफार्म) आणि सिनोवॅक बायोटेकने विकसित केल्या आहेत. तर, CanSino Biologicsने विकसित केलेली लस लष्करी जवानांना देण्यास जून महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. याआधी सिनोफार्मने सामान्यांच्या वापरासाठी डिसेंबर महिन्यात लस उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती.

वाचा: करोना: तोंडावाटे आणि नाकातून देण्यात येणारी लस प्रभावी ठरणार!


वाचा: करोना: अमेरिकेत डिसेंबरमध्ये लस; 'या' कंपनीने केला दावा!

दरम्यान, रशिया आणि चीननंतर आता संयुक्त अरब अमिरातीनेही लस वापराला मंजुरी दिली आहे. आपात्कालीन परिस्थितीत लस वापरता येणार आहे. करोना लशीची मानवी सुरू झाल्यानंतरच्या सहा आठवड्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या सिनोफार्म कंपनीने ही लस विकसित केली आहे. सध्या जगभरातील विविध देशांमध्ये लस स्पर्धा सुरू आहेत. अडीच कोटींहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ९ लाख २५ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे लस स्पर्धाही तीव्र झाली आहे. रशियाने ऑगस्ट महिन्यात लस विकसित केली असल्याची घोषणा केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज