अ‍ॅपशहर

Imran Khan: शांततेची संधी द्या; इम्रान खान यांची विनंती

पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला अखेर उपरती झाली असून पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शांततेची संधी देण्याची साद घातली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 25 Feb 2019, 4:13 pm
वृत्तसंस्था, इस्लामाबाद

पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला अखेर उपरती झाली असून पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शांततेची संधी देण्याची साद घातली आहे. मात्र, अशी साद घालतानाच ‘भारताने कृतियोग्य पुरावे दिले, तर आम्ही तातडीने कारवाई करू, दिलेल्या शब्दाला जागू’ या जुन्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. शांततेची संधी देण्याची मागणी इम्रान यांनी केल्यामुळे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग होता, याला पुष्टीच मिळाल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे, ‘पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या शब्दावर कायम असून जर भारताने कृतियोग्य पुरावे दिले, तर आम्ही तातडीने कारवाई करू. पंतप्रधान मोदी यांनी शांततेची एक संधी देण्याची गरज आहे.’ पुलवामा हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी भारताकडे या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करणाऱ्या पुराव्याची मागणी करतानाच भारताने हल्ला केला, तर प्रतिहल्ला करू, अशी दर्पोक्ती केली होती. मात्र, रविवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये पाकिस्तानला शांततेची संधी देण्याची मागणी केली आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संताप उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध सभांतून सातत्याने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत देत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत कठोर कारवाई करण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानने अखेर भारताकडे शांततेची एक संधी देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थान येथील सभेत इम्रान खान यांच्याबरोबर झालेल्या संवादाची आठवण सांगितली होती. खान यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे मोदी यांनी अभिनंदन केले होते. त्या वेळी आपण गरिबी आणि अशिक्षित यांच्याविरोधात लढू, असे इम्रान यांनी आपल्याला शब्द दिला; पठाण असूनही त्यांनी तो पाळला नाही, असे वक्तव्य मोदी यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी रविवारी शांततेची संधी देण्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज