अ‍ॅपशहर

स्वप्ने पाहू नका, काश्मीर भारताचंच राहणार!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७१ व्या आमसभेत बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला खडेबोल सुनावले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार, असे निक्षून सांगताना पाकिस्तानने काश्मीरबाबत स्वप्ने पाहणे सोडावे, असे सुषमा यांनी ठणकावले.

Maharashtra Times 26 Sep 2016, 8:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । संयुक्त राष्ट्रसंघ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma swaraj names and shames pakistan at un
स्वप्ने पाहू नका, काश्मीर भारताचंच राहणार!


संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७१ व्या आमसभेत बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला खडेबोल सुनावले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार, असे निक्षून सांगताना पाकिस्तानने काश्मीरबाबत स्वप्ने पाहणे सोडावे, असे सुषमा यांनी ठणकावले.

'जिनके घर शीशे के हो वो दुसरों पर पत्थर नहीं फेंकते', असे फटकारत सुषमा यांनी पाकला फैलावर घेतले. पाकिस्तानने आत्मचिंतन करावे. बलुचिस्तानात काय चालले आहे ते पाहावे, असा सल्ला सुषमा यांनी दिला.

मैत्रीच्या बदल्यात उरी आणि पठाणकोट मिळाले

पाकिस्तानचे पंतप्रधान कोणत्या अटींविषयी बोलत आहेत. आम्ही अटी केव्हा घातल्या?, अटी ते घालताहेत की आम्ही?, पंतप्रधान नरेंद्र मोदी अटी आणि शर्ती घालून लाहोरला गेले होते का? अशा प्रश्नांची सरबत्ती करताना आम्ही नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला पण त्याबदल्यात आम्हाला पठाणकोट आणि उरी मिळाले, असा हल्ला सुषमा यांनी चढवला. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बहादूर अली हा भारताच्या तावडीत आहे. त्याचा उल्लेख करत पाकिस्तानातून भारताच्या सीमेत चाललेल्या घुसखोरीचा हा जिवंत पुरावा असल्याचे सुषमा यांनी नमूद केले.

दहशतवाद पोसणाऱ्यांना उघडे पाडा

दहशतवाद हा एखाद्या देशाचा वा व्यक्तीचा नाही तर संपूर्ण मानवतेचाच शत्रू आहे, अशा शब्दांत दहशतवादाच्या जागतिक समस्येवर सुषमा यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवाद कोण पोसतंय, त्यांना आर्थिक रसद कुठून मिळते, याच्या मुळाशी जायला हवं. आधीची समीकरणं त्यागून सर्वांनी मिळून एकजुटीने दहशतवादाचा सामना करण्याची वेळ आली आहे. जर एखादा देश या लढ्यात सहभागी होत नसेल तर त्याला एकटं पाडायला हवं. काही देश दहशतवादाची पेरणी करतात. त्यास आश्रय देतात. दहशतवादी घडवून त्यांची निर्यात करतात असे देश कोणते आहेत त्यांना उघडे पाडायला हवे, अशी तोफही सुषमा यांनी डागली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज