अ‍ॅपशहर

पाकिस्तानची ‘महा’सार्कसाठी खेळी

सध्याच्या आठ देशांचा सहभाग असलेल्या द​क्षिण आशियाई देशांच्या ‘सार्क’ संघटनेवरील भारताच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाकिस्तान महा‘सार्क’ची शक्यता अजमावून पाहत आहे. यात चीन, इराण आणि मध्य आशियामधील देशांचा समावेश असू शकेल. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

Maharashtra Times 13 Oct 2016, 12:41 am
भारताला शह देण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to counter indias saarc influence pakistan explores another economic alliance
पाकिस्तानची ‘महा’सार्कसाठी खेळी


वृत्तसंस्था, इस्लामाबाद

सध्याच्या आठ देशांचा सहभाग असलेल्या द​क्षिण आशियाई देशांच्या ‘सार्क’ संघटनेवरील भारताच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाकिस्तान महा‘सार्क’ची शक्यता अजमावून पाहत आहे. यात चीन, इराण आणि मध्य आशियामधील देशांचा समावेश असू शकेल. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या संसदीय शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात झालेल्या वॉशिंग्टन भेटीत ही कल्पना मांडली. दक्षिण आशिया आर्थिक पटलावर अधिक व्यापक स्वरूपात याआधीच दृष्टिपथात येत असल्याचे पाक संसद सदस्य मुशाहीद हुसेन सय्यद यांनी म्हटले आहे. ‘चीन आणि पाकिस्तान दरम्यानचा आर्थिक संबंध हा दक्षिण आशिया आणि मध्य आशिया यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे ते म्हणाले. ग्वादर बंदर हे केवळ चीनसाठीच नव्हे तर अन्य मध्य आशियाई देशांसाठी महत्त्वाचे बंदर ठरू शकेल. भारतानेही यात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे,’ असे सय्यद म्हणाले.

मात्र, भारत सध्या अस्तित्वात असलेल्या ‘सार्क’मधून मिळणाऱ्या लाभामुळे समाधानी असल्याने हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता नाही, असे वृत्तामध्ये म्हटले आहे. भारताने देशातील दहशतवादी कारवायांचा निषेध म्हणून आपल्या सार्कमधील प्रबळ स्थानाचा वापर करत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या १९व्या सार्क परिषदेत उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनीही या परिषदेतून काढता पाय घेतला होता.

पाकिस्तान ‘महा’सार्कसाठी प्रयत्नशील असल्याच्या वृत्ताला एका ज्येष्ठ पाक मुत्सद्द्याने दुजोरा दिला आहे. नव्या संघटनेत पाकिस्तानला स्वतःसाठी अधिक वाव मिळेल आणि भारताचे महत्त्व कमी करता येईल, असा विचार यामागे असल्याचे तो म्हणाल्याचे वृत्तात म्हटले आहे.

महासार्कची कल्पना चीनसाठीही फायद्याची ठरू शकेल. मध्य आशियाई देश आणि इराण यांना या संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी चीन दबाव आणू शकेल. पण यातून बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांनाही या प्रस्तावात फारसा रस नसण्याची शक्यता आहे. बांगला देश आणि श्रीलंकेकडे तर स्वतःची बंदरे आहेत. केवळ अफगाणिस्तानला यातून फायदा होऊ शकेल. पण सध्याचे भारत आणि अफगाणिस्तान यांचे घनिष्ठ संबंध पाहता, अफगाणिस्तानही या प्रस्तावाला अनुकूल असण्याची शक्यता नसल्याचे या वृत्तात नमूद आहे.

‘महा’सार्कची कल्पना प्रत्यक्षात आली तरी मध्य आशियातील देशा भारत पाक वादात पाकच्या बाजूने उभे राहतील, अशी शक्यता नाही कारण मध्य आशियातील अनेक देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज