अ‍ॅपशहर

करोना विषाणू उगम: अमेरिकेच्या हाती चीनविरोधात ठोस पुरावा?

चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये पहिल्या करोनाबाधिताची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यातच करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला. करोनाची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत करण्यात आल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2021, 5:03 pm
वॉशिंग्टन: करोना विषाणूच्या संसर्गाचा उगम स्रोताची चौकशी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलेली मुदत आज संपुष्टात आली आहे. बायडन यांनी २६ मे रोजी अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा, संस्थांना करोना उगमाची चौकशी करण्यासाठी आदेश दिले होते. अमेरिकेच्या या चौकशी अहवालाकडे जगभराचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wuhan-institute
करोना विषाणू उगम: अमेरिकेच्या हाती चीनविरोधात ठोस पुरावा?


दीड वर्षांहून अधिक काळापासून जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये पहिल्या करोनाबाधिताची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यातच करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला. करोनाचा उगम चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत झाला आणि तेथूनच विषाणू फैलावला असल्याचा आरोप तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तर, चीनने हे आरोप फेटाळून लावले होते.

बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर करोना विषाणूचा उगम कसा झाला, प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला का, आदींबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन तपास यंत्रणांकडून या चौकशीबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. मात्र, चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या विषाणूचा डीएनए अहवाल अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या हाती लागला असल्याची चर्चा आहे. याला अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिला नाही.

या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी वुहान येथील प्रयोगशाळेची पाहणी करत तपासणी केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात करोना विषाणूची निर्मिती प्रयोगशाळेत झाली असावी यावर असहमती दर्शवण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा प्रयोगशाळेची तपासणी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, चीनने त्याला नकार दिला.

करोना विषाणू उत्पत्ती आणि संसर्गाची चर्चेत असलेली कारणे

वुहान येथील पशू बाजारातून वटवाघूळ अथवा इतर प्राण्यामधून करोना विषाणूचा संसर्ग माणसांना झाला असावा आणि त्यानंतर विषाणू फैलावला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, वुहान येथील पशू बाजारात इतर प्राण्यांमध्ये करोनाचा विषाणू आढळला नाही.

करोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार केला असावा. मात्र, या दाव्याला दुजोरा देणारा ठोस पुरावा समोर आला नाही. या उलट जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या पहिल्या चौकशीत हा दावा फेटाळला होता.

करोनाचा उगम इतर देशात झाला. मात्र, मालवाहतूक, खाद्य पदार्थाच्या वाहतुकीतून हा विषाणू चीनमध्ये आला आणि सर्वत्र पसरला असाही दावा करण्यात येतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज