अ‍ॅपशहर

रशियाकडून करारभंगाचा अमेरिकेचा आरोप

'रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नव्या आण्विक अस्रांची निर्मिती करून शीतयुद्धाच्या काळातील कराराचा भंग केला आहे,' असा आरोप अमेरिकेने केला आहे.

Maharashtra Times 3 Mar 2018, 5:19 am
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम us-russia


'रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नव्या आण्विक अस्रांची निर्मिती करून शीतयुद्धाच्या काळातील कराराचा भंग केला आहे,' असा आरोप अमेरिकेने केला आहे. रशियाने अण्विक सामर्थ्य वाढवले तरीही अमेरिकी लष्कर आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे, अशा शब्दांत अमेरिकेने रशियाला इशाराही दिला.

नुकत्याच झालेल्या जाहीर कार्यक्रमात रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रशियाच्या अस्र निर्मितीबाबत विधान केले होते. याबाबतचा व्हिडिओ उपलब्ध आहे. ते म्हणाले होते, 'रशियाने अत्याधुनिक शस्रास्र यंत्रणा विकसित केल्या आहेत त्यामध्ये आण्विक क्रूझ क्षेपणास्राचाही समावेश आहे. त्यामुळे अमेरिकी लष्कराच्या सर्व क्षमतांना लक्ष्य करता येणे शक्य होईल.' यानंतर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव साराह सँडर्स म्हणाले, 'गेली अनेक वर्षे अमेरिका सरकारला रशियाच्या अण्विक अस्रांबाबत माहिती होती; पण रशियाने ते मान्य केले नाही. तीच गोष्ट अध्यक्ष पुतिन यांनी मान्य केली आहे. गेल्या दशकापासून रशिया जगात अस्थैर्य निर्माण करणाऱ्या क्षेपणास्रांची यंत्रणा निर्माण करत आहे. ते शीतयुद्धातील करारांचे थेट उल्लंघनच होते. अमेरिकेला असलेल्या धोक्यांची, या शतकातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांशी असलेल्या संबंधांची माहिती अध्यक्ष ट्रम्प यांना आहे. आपल्या शक्तीच्या जोरावर मातृभूमीचे रक्षण कसे करायचे हे आम्ही जाणतो.'

'आता अमेरिकेचा संरक्षण अर्थसंकल्प ७०० कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे आमचे लष्कर याआधी कधी नव्हते इतके बळकट झाले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी सादर केलेल्या आण्विक आढाव्यातून हे स्पष्ट झाले आहेत की, अमेरिका आपल्या शस्रसाठ्यात अत्याधुनिक आणि अण्विक शस्रांचा समावेश करणार आहे. यामुळे आमच्या लष्कराच्या क्षमता अतुलनीय होतील,' असेही सँडर्स यांनी सांगितले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आपल्या भाषणात अमेरिकेला लक्ष्य केल्याचा व्हिडिओ पाहून चिंता वाटत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज