अ‍ॅपशहर

२०१७ च्या यूपी निकालाने २०१९ चं भविष्य ठरवलं, आता २०२२ चे निकाल २०२४ चं भविष्य ठरवतील : मोदी

उत्तर प्रदेशसह चार राज्यांत विराट विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी प्रमुख राज्य असलेल्या यूपीची जनता आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2022, 8:38 pm
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह चार राज्यांत विराट विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी जनता जनार्दनाचे आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानले. चार राज्यांत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर लोकसभा २०२४ निवडणुकीसंदर्भात मोदींनी मोठं वक्तव्य केलं. २०१७ च्या यूपी निवडणूक निकालाने २०१९ ची दिशा ठरवली. आता २०२२ निवडणूक निकाल २०१४ चं भविष्य ठरवेल, असं मोदी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narendra modi
नरेंद्र मोदी (पंतप्रधान)


पाच राज्याच्या निवडणुकींचे निकाल समोर आले आहेत. यात भाजपने दणदणीत यश मिळवलं आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन राजधानी नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पार पडलं. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती होती. मोदींबरोबर, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, "२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी पुन्हा भाजपला सत्तेत बसवलं. पण राजकीय विश्लेषक म्हणत होते, की हे आधीच ठरलं होतं, ज्यावेळी २०१७ मध्ये यूपीचा निकाल आला होता. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपला यश मिळालं होतं"

"२०१७ च्या यूपी निकालांनी लोकसभा २०१९ चं भविष्य ठरवलं, आता २०२२ यूपी इलेक्शन निकाल २०२४ चं भविष्य ठरवतील", असं मोठं विधान मोदींनी केलं. एकंदरित पंतप्रधान मोदींना हे सूचित करायचं होतं, की २०२२ ला पुन्हा योगी सत्तेत आलेत, म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचं सरकार येईल.

"उत्तर प्रदेशच्या जनेतला आतापर्यंत फक्त जातीवादात बांधून ठेवलं होतं. जातीवादी म्हणत उत्तर प्रदेशला बदनाम केलं होतं. पण आज युपीच्या जनतेने सगळ्यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. आता विरोधकांना विकासाचा नव्याने विचार करावा लागेल.", असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, "गरिबांच्या घरी विकासाची गंगा पोहोचवल्याविना मी शांत बसणारा व्यक्ती नाही. सरकार चालविताना किती अडचणी येतात, हे मला माहितीय. तरीही मी हिम्मत केली, ती हिम्मत लाल किल्ल्यावरुन केली. त्यावेळी मी म्हटलं, भाजपला जिथे जिथे सेवा करण्याची संधी मिळेल, तिथे प्रत्येक गरिबाच्या घरी, अगदी तळातल्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. आज निवडणुकीचे निकाल पाहताना, माझं स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद आहे. महिला, युवक, कष्टकरी सगळ्यांनीच भाजपवर विश्वास ठेवला, ज्यांनी ज्यांनी भाजपला मतदान केलं, त्यांचे मी आभार मानतो. भाजपच्या बंपर विजयाला तुम्ही सगळे जबाबदार आहेत. कार्यकर्ते भाजपच्या विजयाचे सारथी बनले. कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम केल्याने हा विजय शक्य झाला"

महत्वाचे लेख