अ‍ॅपशहर

पैठणीचा रुबाब! साड्यांची महाराणी पैठणीचा ‘हा’ इतिहास माहीत आहे का? वाचा सविस्तर

पैठणी पुन्हा नववैभव,नवचैतन्य प्राप्त करत आहे. त्यास गती देण्यासाठी व शुद्ध रेशीम व जर वापरून तयार होणाऱ्या ओरिजिनल पैठणीचा रुबाब वाढवण्यासाठी अधिक अधिक प्रयत्नांची गरज मात्र निश्चित आहे.

Curated byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2021, 2:29 pm
अस्मिता रंजन देसाई-धांडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम history of paithani sarees everything you need to about this maharashtrian costume
पैठणीचा रुबाब! साड्यांची महाराणी पैठणीचा ‘हा’ इतिहास माहीत आहे का? वाचा सविस्तर

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर एक पोस्ट फिरत होती. त्यात प्रश्नचिन्हाच्या आकाराचे कपाट दाखवले होते. खाली एक कमेंट पण होती. ‘एवढे कपाट गच्च भरले असताना ही बाई म्हणतेय की, माझ्याकडे कार्यक्रमाला नेसायला साडीच नाही’. अजून एक पोस्ट होती, पती-पत्नीचा संवाद होता. पती- अगं, मी तुझ्यासाठी नवी साडी आणली आहे.

बघं तरी जरा .. पत्नी – (खूष होऊन) अय्या खरंच ? खूप सुंदर आहे पण या रंगाची आणि डिझाईनची साडी आहे माझ्याकडे.. कोठून आणली ? पती : तुझ्याच कपटातून आणली. घडी न मोडलेली आहे. बायकांसाठी साड्या हा जिव्हाळ्याचा विषय तर, पुरुषांसाठी चेष्टेचा विषय ठरलेला आहे. कपाटात कितीही साड्या असल्या तरी ‘साडी नाहीच’ हे महिलांचे वाक्य ठरलेले. (Photo Credits TOI/NBT)

​साडीचा इतिहास

साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपरिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र प्रकार आहे. साडी नेसायला अ‌वघड असली तरी, संपूर्ण जगात तिच्याबद्दल अपार उत्सुकता असते. जी नेसल्यावर स्त्री सुंदर, आकर्षक, सर्वांहून वेगळी दिसते. ते वस्त्र म्हणजे साडी. साडी हा शब्द संस्कृत भाषेतील शाटी किंवा शाटिका या शब्दावरुन निर्माण झाला आहे. शाटिका म्हणजे चौकांनी आकाराचे लांब वस्त्र. भारतात साडी नेसण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जगातील सर्वात जुन्या वस्त्रांपैकी एक वस्त्र म्हणजे साडी. महिलांनी कमरे भोवती गुंडाळून नेसण्याचे विशिष्ट लांबी, रुंदीचे आयाताकृती कापड. साडीची लांबी साधारण पाच ते नऊ वार (अंदाजे साडेपाच ते आठ मीटर) इतकी असते. भारतात अतिप्राचीन काळापासून साडी नेसण्याची परंपरा आहे. प्राचीन काळातील शिल्पांवरुन भारतात साडी नेसण्याची पद्धत व साडीचे प्रकार लक्षात येतात. भारतात प्रत्येक प्रांतातील साडीचा प्रकार व नेसण्याची पद्धत निरनिराळी आहे. जसे राजस्थान - बांधणी, घागरा ओढणी, बंगालची पदर घेण्याची विशिष्ट पद्धत - जामधनी, दक्षिण भारतातील नारायण पेठी, इरकली, पोचमपल्ली कांजीवरम, मध्य प्रदेशातील चंदेरी, गुजरात, कच्छमध्ये उलटा पदर घेण्याची पद्धत असणारी पटोला, ओरिसात इक्कत, केरळ–धर्मावरम, टेम्पल सिल्क, काश्मिरची कशीदा कारी, तर महाराष्ट्राची जरीची नऊवार, सहावार व बनारसचा शालु हे सर्व प्रकार भारतभर प्रसिद्ध आहेत.

​महाराष्ट्राचे वेगळपण

महाराष्ट्रातील साडी नेसण्याची पद्धत वेगळी आहे. तसे साडीला नावेही वेगवेगळी आहेत. जसे लुगडी, चिरडी, पातळ, पीतांबर,शालु आणि पैठणी. त्यात नऊवारी साडी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व रुबाबदार असून पेहरावात शालीनता व भारदस्तपणा दिसतो. पूर्वी चोळी वापरली जाई आता ब्लाऊजची फॅशन रुढ झाली आहे. साधारणपणे २० व्या शतकात साडीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी केवळ विवाह प्रसंगीच भरजरी वस्त्र नववधूला उपहार म्हणून दिले जाई. मौल्यवान, भरजरी, आकर्षक रंगसंगत व नक्षीकाम असणाऱ्या साड्या नेसवल्या जात. यात सर्वप्रथम मान मिळतो तो महाराष्ट्राची पारंपरिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या पैठणी या साडीला. पैठणी साडीला ‘महावस्त्र’, ‘साड्यांची महाराणी’ असे म्हटले आहे. पैठणी साडी आपल्या संग्रहात पाहिजेच, असे प्रत्येक स्त्रीने पाहिलेले स्वप्न असते.

(खुल्लम खुल्ला प्यार! अन् ऐश्वर्याच्या गालांवरी चढली लाजची लाली, पती मोहक रूपाकडेच पाहत होता एकटक)

​पैठणीचा इतिहास

पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला २००० वर्षाची पंरपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. प्राचीन काळी पैठणला प्रतिष्ठान, पाटन, पट्टून, पोतान, पैठान अशा अनेक नावांनी ओळखले जात होते. या शहराला सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचा वैभवशाली इतिहास आहे. संतांची भूमी, विद्वान-पंडितांची, विद्यानगरी म्हणून पैठणची ओळख आहे. प्रतिष्ठान ही राजधानी असणाऱ्या सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली, असा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. पैठणी साडीची निर्मितीच प्रामुख्याने भारतातून परदेशात निर्यात करण्यासाठी आणि राजकोषात भर घालण्यासाठी झाली. भारतीय विणकाम, वस्त्राचा पोत, रंगसंगती, नक्षीकाम टिकाऊपणा साडी नेसण्याची पद्धत या सर्व गोष्टी विदेशी ग्राहकांना आकर्षित करत. फार पूर्वीपासून पैठणीला विदेशात प्रचंड मागणी होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून कापड निर्यातीला सुरुवात झाली. गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन काळात पैठणी निर्मिती उद्योगाला नवी ओळख करुन दिली. या काळात हा उद्योग प्रगतीच्या उच्चशिखरावर होता. रोम, इटली या देशात पैठणी वस्त्र मोठ्या प्रमाणात निर्यात होत.

एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने -चांदी, हिरे -माणिके यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे यांचे जर वापरुन तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. एक सहावारी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. साधारणपणे पाचशे ग्रॅम रेशीम धागे आणि अडीचशे ग्रॅम जर लागते. पैठणीचे वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, आदी रंगामध्येही तयार होऊ लागली.

पुढे यादव राजवंशाच्या काळातही पैठणीला विदेशात मागणी होती. मराठे, पेशवे यांच्या साम्राज्यात पैठणीला राजाश्रय मिळाला. राज घराण्यातील महिला याच साड्यांना पसंती देत. राजाश्रयाबरोबच नंतर तिला लोकाश्रय मिळू लागला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असणारी पैठणी सौभाग्याचे लेणे म्हणून मिरवू लागली. नववधूला ‘पैठणी’ या महावस्त्राने अलंकृत करुन तिची सासरी पाठवणी होऊ लागली. तिला पूजेत मान मिळाला. पंढरपूरच्या विठू माऊली, कोल्हापुरची अंबाबाई यांना खास पैठणी वस्त्र विणून सजवले जाऊ लागले. जर आणि रेशीम यांच्या एकेक धाग्यांच्या तानाबान्यातून, विविध फुले, पक्षी यांच्या आकृत्यांचे नक्षीकाम विणताना विणकर आपला जीव त्या कलाकुसरीत ओततो. ऐतिहासिक वैभव आणि भारतीय कला यांचा सुंदर मिलाफ पैठणीत दिसतो. पैठणी विणताना विणकरांनी अनेक पिढ्यांचे अनुभव आणि परिश्रम खर्ची घातले असतात.

​व्यवसायाला उतरती कळा

जसा काळ पुढे सरकत होता तशी राजकीय स्थित्यंतरे घडत गेली. परकीय आक्रमणे झाली. निजामशाही आली. इंग्रज आले, सत्ता बदलांमुळे पैठणी व्यवसायाला उतरती कळा आली. पैठणीचा राजाश्रय हळूहळू संपुष्टात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्या चांदीचे भाव वाढले. हातमाग जाऊन त्यांच्या जागी यंत्रे आली. त्यामुळे हळुहळु पैठणी निर्मितीचे कारागीर बेरोजगार झाले. ग्राहकवर्गही कमी झाला. परिणामी पैठणीचे कारागीर पैठण शहरातून विस्थापित झाले. अनेक विणकरांना बळजबरीने स्थलांतरीत केले गेले. काही पुणे येथे तर, काही कारागिरांना व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी आणून प्रस्थापित केले आणि पैठणी निर्मितीचे केंद्र पैठणहून येवला येथे स्थापन झाले. येवला शहरातही ३००ते ३५० वर्षांपासून हा व्यवसाय अस्तित्वात आहे.

(मलायकाच्या बर्थडे पार्टीत दोन मुलांच्या आईनं सर्वांचं वेधलं लक्ष, करीनाचा ग्लॅमरस लुकही पडला फिका)

​सोनेरी दिवसासाठी प्रयत्न

भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर शासनाच्या आर्थिक धोरणानूसार पैठण येथे १९६८मध्ये पैठणी उत्पादन केंद्र सुरु करण्यात आले. १९७४ पासून पैठणी उद्योगाचा पुनर्विकास करण्याचे काम शासनाच्या महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाकडे सोपवले. या मंडळाने पैठण व येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना उत्तेजन देऊन पैठणी निर्मितीचे काम जोमाने सुरू केले. परंतु यंत्रयुगामुळे व निर्मितीच्या प्रचंड खर्चामु‌ळे विणलेल्या पैठणीची किंमत अधिकच होती. अशा वेळी पैठणीला मागणी कमी होऊन विवाहप्रसंगी नववधूच्या वस्त्रांमध्ये बनारसी शालुने पसंतीचे स्थान पटकावले.

भडक रंगाच्या, भरजरी, यंत्रावरील या साड्यांनी बाजारपेठ काबीज केली. त्याच वेळी ऐतिहासिक, पारंपरिक वारसा असलेल्या पैठणीला पुन्हा सोनेरी दिवस आणण्यासाठी शासनाने जोरदार प्रयत्न सुरु केले. पैठण येथे १९८०च्या दशकात हातमागाची संख्या वाढवली. प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणवर्ग सुरू केले. त्यात महिला प्रशिक्षणार्थींची संख्या वाढवली. १५ ते २० हातमागांची असणारी संख्या पुढे २०१०च्या दशकात३०० ते ४०० पर्यंत वाढवली. पैठणप्रमाणे येवला येथे ही हातमाग संख्या १९८० साली २५० ते ३०० होती ती २०१०च्या दशकानंतर १०००च्या घरात गेली. आर्थिक अनुदान दिलेय पैठणीचे उगमस्थान पैठण शहर असले तरी येवल्यात आल्यानंतर तिच्या मूळ रुपात फरक झालेला दिसतो. हातमागाची संख्या वाढली तरी गुणात्मकता कमी झालेली दिसते. माझ्या आजीच्या, आईच्या पैठणीमध्ये आणि माझ्या स्वत:च्या पैठणीमध्ये हा फरक सहज ओळखता येतो.

येवला आणि पैठणी या दोन्ही ठिकाणीच्या साड्यांमध्ये तुलना केली जाते. पैठणची पैठणी ही खरी ओळख असणारी पैठणीची बाजारपेठ पैठण पेक्षा येवल्यातच मोठ्या प्रमाणावर दिसते. पैठणला पर्यटनासाठी आल्यावर लोक पैठणी खरेदी करतात. पण येवला येथे लग्नकार्याचा बस्ता बांधण्यासाठी, खास पैठणी खरेदीसाठी जातात. पैठणला पैठणीचे अनेक निर्माते आहेत. ते व्यापारही करतात. पैठणचे प्रभाकर डालकरी तसेच येवल्यातील शांतीलाल भांडगे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्रातील एकूण पैठणी उत्पादनात येवल्याचा सुमारे ८० टक्के वाटा आहे. त्यामुळे खरी पैठणी येवल्याचीच आहे, असे समजले जाते, असे विधान अभिनेते आदेश बांदेकर यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात केले होते.

येवल्यामध्ये घराघरात पैठणीचे हातमाग, विक्री केंद्रे दिसतात. कस्तुरी पैठणी सारखे ऑनलाइन शापिंग आहे. त्या तुलनेत पैठणच्या पैठणी साडीचा दर्जा उत्कृष्ट असूनही पैठणीचे मार्केटिंग होऊ शकले नाही. मात्र, पैठण शहरात प्राचीन काळातील पैठणीचे अस्तित्व तेथील गल्ल्यांच्या नावावरुन दिसते. जर गल्ली, तार गल्ली, रंगार गल्ली, हताई मोहल्ला, पावटा गल्ली, साळी वाडा इ. तसे येवल्यात पैठणीच्या अतिप्राचीन संस्कृतीची चिन्हे नाहीत.

​पैठणीचे आधुनिक रूप

सध्याच्या काळात मात्र पैठणीला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. त्यात अभिनेते आदेश बांदेकरच्या होम मिनिस्टरने महिलांमध्ये स्पर्धा लावून त्यांच्या मनात पैठणीचे मानाचे स्थान निर्माण केले. पूर्वी फक्त राजघराण्यातच असणारी पैठणी आता सर्वसामान्यांच्या घरात दिसत आहे. कृत्रिम धागे, कृत्रिम जर आणि यंत्रावरील उत्पादनामुळे पैठणी निर्मितीचा खर्च कमी झाला, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत पैठणीची विक्री करणे शक्य आहे.

हातमागावर देखील पैठणीची निर्मिती होत आहे. यात सिंगल पल्लु (एकपदरी) डब्बल पल्लू (दुपदरी) असे प्रकार आहेत. संपूर्ण साडीवर बुट्टी विणलेली असते, मुख्य आकर्षण असतो तो पदर आणि बॉर्डर. बांगडी मोर, पोपट, मैना, अजिंठा कमळ, कुयरी (आंब्याचा आकार), आक्रोटी असे नक्षीकाम जरीने केलेले असते. सध्या सिल्क, ब्रोकेड, टिश्यु, कॉटन अशा धाग्यांचे प्रकार दिसून येतात. तसेच पेशवाई पैठणी, खण पैठणी, इरकल पैठणी, सेमी पैठणी, कडीयाल पैठणी (कर्नाटक धाटणी) धुपछॉंव पैठणी, मुनीया पैठणी इत्यादी फ्युजन प्रकार कमी किंमतीत मध्ये उपलब्ध आहेत. पैठणी साडी ही फक्त नववधूची न राहता लग्नातील संपूर्ण वऱ्हाडातील स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

(कृति सेनॉनच्या बोल्ड लुकला छोटी बहीण नूपुरनं हॉट अवताराने दिली जबरदस्त टक्कर, एक-एक फोटो पाहून व्हाल घायाळ)

​पैठणी- तरुणाईची फॅशन

पैठणी म्हटलं की, साडी हे समीकरण आधुनिक काळात बदलले आहे. फॅशनच्या असंख्य क्षेत्रात पैठणीने शिरकाव केला असून तिची आंतरराष्ट्रीय झेप सुद्धा उंचावली आहे. २०००मध्ये ब्रिटिश एअरवेजने विमानाचा बाहेरील भाग पैठणीच्या नक्षीने सजवला होता. तसेच त्यांचे तिकीट, पेन, पेन्सिल, टी – शर्ट अशा वस्तूंवर पैठणीची नक्षी झळकली होती. आजकाल तरुण वर्गामध्ये पैठणीची फॅशन म्हणून प्रसिद्धी होत आहे. जसे कुर्ती, जाकीट, धोती, घागरा ओढणी, ब्लाऊज, वॉलपीस, पर्स, ट्रे, वनपीस, तोरण, आकाश कंदील अशा अनेक वस्तूंवर पैठणीचा ठसा उमटत आहे. अशा रितीने राखेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पैठणी पुन्हा नववैभव,नवचैतन्य प्राप्त करत आहे. त्यास गती देण्यासाठी व शुद्ध रेशीम व जर वापरून तयार होणाऱ्या ओरिजिनल पैठणीचा रुबाब वाढवण्यासाठी अधिक अधिक प्रयत्नांची गरज मात्र निश्चित आहे.

सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी ‘पैठणी’ या कवितेत त्यांच्या आजीच्या पैठणीचे वर्णन केले आहे. त्यातील काही ओळी …..

वर्षामागून वर्ष गेली

संसाराचा सराव झाला

नवा कोरा कडक पोत

एक मऊपणा ल्याला

पैठणीच्या घडी घडीतून

अवघे आयुष्य उलगडत गेले

अहेवपणी मरण आले

आजीच्या माझे सोने झाले….

अशी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे सोने करणारी, सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र पैठणी….

महत्वाचे लेख