अ‍ॅपशहर

कपड्याची कॉपी पडेल महागात

कुठल्याही प्रसिद्ध फॅशन डिझायनरने सादर केलेल्या कपड्यांची नक्कल होण्याचे प्रकार सर्रास घडू लागलेत. त्याच डिझाइनचे कपडे सहज मार्केटमध्ये येत असून, त्याला आळा घालण्यासाठी स्वतः डिझायनर्सनीच पावलं उचलली आहे. त्यांनी आपल्या डिझाइन्सचं पेटंट घ्यायला सुरुवात केली आहे…

Maharashtra Times 17 Aug 2017, 3:23 am
प्राची आंधळकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम patent for fashion designers
कपड्याची कॉपी पडेल महागात


कुठल्याही प्रसिद्ध फॅशन डिझायनरने सादर केलेल्या कपड्यांची नक्कल होण्याचे प्रकार सर्रास घडू लागलेत. त्याच डिझाइनचे कपडे सहज मार्केटमध्ये येत असून, त्याला आळा घालण्यासाठी स्वतः डिझायनर्सनीच पावलं उचलली आहे. त्यांनी आपल्या डिझाइन्सचं पेटंट घ्यायला सुरुवात केली आहे…

‘मॅडम, वो फेमस फॅशन वीक के कपडे हमारे पास मिलते है| सिर्फ आपको कौनसे डिझायनर के चाहिए वो बताओ’, ‘तुम्हाला काय पाहिजे ते फक्त सांगा. अनिता डोंगरे, अंजू मोदी, रितू कुमार आणि मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेले कपडे पण बनवून देऊ’…कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना मुंबईच्या मार्केटमध्ये असे संवाद नवीन नाहीत. प्रसिद्ध फॅशन शोमध्ये डिझायनर्सनी सादर केलेल्या कपड्यांची नक्कल केलेले कपडे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ लागले आहे. या नक्कलबाजीला चाप लावण्यासाठी अंजू मोदी आणि अनिता डोंगरे यासारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी कायद्याची मदत घेतली असून, त्यांनी त्यांच्या डिझाइन्सची पेटंट घ्यायला सुरुवात केली आहे.

फॅशन इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गोष्टी येतच असतात. दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोच्या वेळी डिझायनर अंजू मोदी आणि अनिता डोंगरे यांनी पेटंटबद्दलची माहिती जाहीर केली. याआधी काही डिझायनर्सनी पेटंट घेतले आहेत. पण, इतकं ठोस पाऊल उचलण्याचं उदाहरणं अद्याप समोर आलं नव्हतं. अंजु मोदीनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून सगळ्यांना ह्या नवीन नियमांची माहिती दिली. आज जेव्हा फॅशन इंडस्ट्रीमध्ये नवीन प्रयोग होत आहेत, तेव्हा डिझाइन्सबाबत दक्षता घेणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे, असं अंजू सांगते.

रोहित बाल, गौरव गुप्ता यांनी याआधीच त्यांच्या डिझाइन्सची पेटंट घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्कल करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसत असल्याचं सांगितलं जातंय. वकील सफिर आनंद सांगतात, 'डिझाइन्स पेटंट करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. ही प्रक्रिया एक-दोन दिवसात पूर्ण होते. त्यामुळे प्रत्येक डिझायनरने पेटंट हा पर्याय निवडायला हवा. त्याशिवाय या परिस्थितीत बदल झालेला दिसून येणार नाही.' कपडे पेटंट झाल्यामुळे डिझाइनला व्यावसायिक मूल्य प्राप्त होतं. त्यामुळे पेटंट होणं हे डिझायनरसाठी फायद्याचं आहे, असं सांगितलं जातंय.

कपड्यांची नक्कल होणं हे काही नवीन राहिलेलं नाही. पण ते नक्कल असलेले कपडेसुद्धा लेबल लावून विकले जाणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. जोपर्यंत कपड्यांच्या डिझाइनचं पेटंट घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही कायद्यानुसार कुठलीही कारवाई करू शकत नाही. त्यामुळे पेटंट घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक डिझाइननुसार ते ठरवून, यापुढे सगळ्या डिझाइन्सची पेटंट घेतली जातील.
- अनिता डोंगरे, फॅशन डिझायनर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज