अ‍ॅपशहर

International Yoga Day कंबरदुखीचा आता व्यायामात होणार नाही व्यत्यय, खुर्चीवर बसून करा सूर्यनमस्कार

International Yoga Day विविध शारीरिक तक्रारींवर योग उपयुक्त आहे. योग हे स्वास्थ्य संरक्षण करणारे म्हणजे मानदुखी, पाठदुखी अशा व्याधी निर्माण होऊ न देणारे आणि स्वास्थ्य संवर्धन करणारे, म्हणजे आहे ती ताकद अजून वाढवणारे, बल देणारे भारतीय प्राचीन शास्त्र आहे. शारीरिक संवर्धनासाठी आज सूर्यनमस्कारांबाबत जाणून घेणार आहोत.

Maharashtra Times 20 Jun 2020, 4:33 pm
- प्रांजली फडणवीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम practice surya namaskar to relieve back pain international yoga day in marathi
International Yoga Day कंबरदुखीचा आता व्यायामात होणार नाही व्यत्यय, खुर्चीवर बसून करा सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार (Surya Namaskar) हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आणि शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्तीचा विकास घडवणारा शास्त्रशुद्ध प्रकार आहे. याला सूर्योपासना किंवा बलोपासना असेही म्हणतात. सूर्यनमस्कार नावामध्ये सूर्य आणि नमस्कार हे दोन शब्द येतात. म्हणजे सूर्याच्या तेजाला नमस्कार करणे! यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. एक तर सूर्योदयाच्या वेळी उठायची सवय लागते. सध्या जागरण, रात्रपाळी किंवा पार्टी यामुळे सकाळी सूर्योदयाच्या वेळेस उठणे कमी झाले आहे. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळी मिळणारा कोवळा सूर्यप्रकाश, त्यातून व्हिटॅमिन-डी आपल्याला मिळत नाही. सूर्याच्या कोवळ्या किरणांत सूर्यनमस्कार केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढून रोगनिवारणाची किमया साध्य होते.
(International Day of Yoga कंबरदुखीचा त्रास १५ मिनिटांत दूर करतील ही ३ आसने)
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जगाने हे मान्य केले आहे, की आपल्याला करोनासहित जगावे लागेल. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. अशा वेळेस सूर्यनमस्कार हे आपल्या सर्वांसाठी वरदान आहे. सूर्यनमस्काराचे काही नियमही आहेत. हृदयविकार, उच्च रक्तदाब, पाठीचे, कमरेचे दुखणे असणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे थोडक्यात व्याधिग्रस्तांनी सूर्यनमस्काराचा व्यायाम करू नये. अशा व्याधिग्रस्त व्यक्तींनी सूर्यनमस्काराचा लाभ कसा घ्यावा, हे आपण पाहणार आहोत.
(Weight Loss पोटावरील चरबी आणि वजन घटवण्यासाठी करा ही योगासने)
सूर्यनमस्काराच्या प्रत्येक स्थितीचा शरीराला आकुंचन आणि प्रसरण पद्धतीने उपयोग होतो. त्यात थोडेसे बदल करून, ज्या व्यक्तींना खाली वाकणे शक्‍य नाही, अशांसाठी खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये पायावर आणि गुडघ्यावर शरीराचा पूर्ण भार उचलला जात नाही, तर तो खुर्चीवर टेकवला जातो. कमरेपासून वर किंवा कमरेच्या खालची अशी अर्धीच हालचाल घडवली जाते. सूर्यनमस्काराचे १०० टक्के फायदे मिळाले नाहीत, तरी ५० टक्के यामुळे मिळू शकतात.
कृती :
- खुर्चीवर बसावे. दोन्ही पाय खाली जमिनीवर व्यवस्थित ठेवावेत. ज्यांना कमरेतून जास्त खाली वाकायचे नाही, त्यांनी दोन उशा दोन्ही पायांच्या मध्ये ठेवाव्यात.
- दोन्ही हात जोडून घ्यावेत. बीजमंत्रासहित सूर्याचे नाव घ्यावे.
- श्वास घेत जोडलेले हात वर घ्यावेत. पूर्ण शरीर ताडासनाप्रमाणे ताणून घ्यावे.
- श्वास सोडत दोन्ही हात पायांच्या मध्ये जमिनीवर किंवा उशीवर ठेवावेत.
- श्वास घेत एक हात वर घ्यावा.
- श्वास सोडत हात खाली आणावा.
- श्वास घेत दुसरा हात वर घ्यावा.
- श्वास सोडत हात खाली आणावा.
- कमरेपासून सरळ होत एक पाय गुडघ्यात दुमडून पोटाजवळ घ्यावा. दोन्ही हातांनी घट्ट धरावा. श्वास सोडत हात सैल करून पाय खाली ठेवावा.
(करोनापासून दूर राहण्यासाठी करा कपालभाति प्राणायम, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे)
- श्वास घेत दुसरा पाय पोटाजवळ घ्यावा. दोन्ही हातांनी घट्ट धरून पोटावर दाबावा. श्वास सोडत पाय खाली ठेवावा.
- तळहात खाली जमिनीवर पायांच्या मध्ये टेकवण्याचा प्रयत्न करावा.
- श्वास घेत कमरेपासून सरळ होत दोन्ही हात ताडासनाप्रमाणे वर घ्यावेत.
- श्वास सोडत दोन्ही हातांचा नमस्कार करावा.
(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज