अ‍ॅपशहर

उठी उठी गोपाळा...

सुट्टीच्या दिवशी लवकर उठून काय करायचं या विचारानं पुन्हा झोपू असं म्हणत असाल, तर थांबा. यामुळे तुमचा थकवा जाणार नाहीच; शिवाय वीकेंडचाही बोऱ्या वाजेल.

Maharashtra Times 21 Sep 2016, 3:00 am
सुट्टी आहे म्हटल्यानंतर आपण निवांत उशीरापर्यंत झोपतो, आठवडाभर लवकर उठण्यानं राहून गेलेली झोप वीकेंडला पूर्ण करण्याच्या विचारानं काहीजण तर अक्षरशः दुपारपर्यंत लोळत पडतात. मात्र, अशा सवयीनं शरीराचं ‘बायोलॉजिकल क्लॉक’ बिघडतं आणि ते आपलं परिणाम दाखवू लागतं. परिणामी, अंगातला थकवा निघत नाहीच; पण शरीर आळसानं ग्रासतं. वीकेंडचे दिवस आळसात गेल्यानं ‘मंडे ब्लूज’च्या मनस्थितीमध्ये शरीर आणखी आळसावतं आणि दिवसाचा फज्जा उडतो, असं स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weekend sleeping
उठी उठी गोपाळा...

खरं तर बऱ्याच नोकरदारांना हा अनुभव असेल. आठवडाभर ठरलेल्या वेळेला उठण्याची सवय असल्यानं सुट्टीच्या दिवशीही सवयीनं याच वेळेला जाग येते. तरीही आपण सुट्टी आहे या आनंदात अंथरूणात लोळत राहातो. यावेळी झोप येतेच असं नाही. त्यामुळे उगाच लोळत पडल्यानं डोळा लागत नाहीच; शिवाय अंग जड पडतं. नुसतं पडून राहाणं निरूत्साह आणतो. ही प्रक्रिया शरीराच्या ‘सर्केडियन रिदम’शी मेळ साधत नसल्यानं त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, असं या अभ्यासाच्या मुख्य संशोधक सुझाना जर्नेलो यांचं मत आहे.
शरीराला सातत्यानं हालचाल करण्याची किंवा मनाला व्यग्र राहाण्याची सवय असेल, तर झोप येत नसूनही अंथरूणात पडून राहिल्यास मेंदूला वैचारिक खाद्य मिळत नाही. त्याची जागा आळस घेतो आणि पुढचा दिवस कंटाळवाणा जातो. सुट्टीचा दिवस स्वतःला ताजतवानं करण्यासाठी घालवायचा असेल, तर लोळत पडणं हा पर्याय नाही. त्यासाठी खालील टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील.
१. सुट्टीच्या दिवशी ठरलेल्या वेळेतच उठून आपली कामं आटपून घ्या. हवं असल्यास दुपारी थोडी विश्रांती घ्या.
२. इतक्या लवकर उठून काय करायचं या विचारानं पुन्हा झोपू असं म्हणत असाल, तर घराबाहेर पडा. प्रसन्न वातावरणात फेरफटका मारून या. योगासनं करा. व्यायाम करा. बाहेरच नाश्ता करा आणि घरी या.
३. वाचायची आवड असेल, तर एखादं सुंदर पुस्तक वाचा. सिनेमा पाहा. संगीत ऐका. मुलांसोबत खेळा. जोडीदारासोबत वेळ घालवा.
४. सकाळच्या वेळेत कामं पटापट होत असल्यानं घरातली आवराआवर, वॉर्डरोबची मांडणी, कपडे धुणं, ईस्त्री, बाहरेच्या इतर जबाबदाऱ्या आटपून घ्या. यामुळे तुम्हाला दमायला होईल आणि दुपारी झोप लागेल.
५. दोन दिवस सुट्टी असेल, तर शनिवारी एक दिवसीय सहलीला जा. यामुळे दिवस सत्कार्मी लागेल आणि कंटाळाही येणार नाही. दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस आराम करा आणि अर्धा दिवस स्वतःसाठी घालवा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज