अ‍ॅपशहर

अतुलनीय दान

रक्तदान श्रेष्ठ दान आहे हे तुम्हीही वाचलं, ऐकलं असेल. अनेक कॉलेजांमधले तुमचे काही दोस्त या अतुलनीय, श्रेष्ठ दानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. आजच्या 'जागतिक रक्तदाता दिना'निमित्त, नियमितपणे रक्तदान करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्याविषयी व्यक्त केलेल्या भावना. हे वाचून तुम्हालाही रक्तदान करण्याची प्रेरणा मिळेल हे नक्की

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 10:50 am
रक्तदान श्रेष्ठ दान आहे हे तुम्हीही वाचलं, ऐकलं असेल. अनेक कॉलेजांमधले तुमचे काही दोस्त या अतुलनीय, श्रेष्ठ दानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. आजच्या 'जागतिक रक्तदाता दिना'निमित्त, नियमितपणे रक्तदान करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्याविषयी व्यक्त केलेल्या भावना. हे वाचून तुम्हालाही रक्तदान करण्याची प्रेरणा मिळेल हे नक्की.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blood donation is best
अतुलनीय दान


नि:स्वार्थी भावनेनं

रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे. एक रक्तदाता म्हणून मला सांगायला आवडेल, की रक्तदानासंबंधी जी काही जणांच्या मनात भीती असते ती तुम्ही प्रत्यक्ष रक्तदान केल्यावरच जाऊ शकते. रक्तदानासारखं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकानं घ्यायला हवा.

निशांत शर्मा, कीर्ती कॉलेज

प्लेटलेट्स दान

सुरुवातीला मला रक्तदानाची भीती वाटायची. पण, मित्रांकडून मला याचं महत्त्व समजलं आणि मी रक्तदान केलं. खूप चांगला अनुभव होता तो. माझ्या मते सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे. कारण रक्ताची गरज ही कधीही कुणालाही भासू शकते. त्याचबरोबर प्लेटलेट्स दान हे देखील रक्तदानासारखंच आहे. यात रक्तातल्या फक्त प्लेटलेट्स काढून घेतल्या जातात. एक व्हिडीओ पाहून हे मला लक्षात आलं. याचा उपयोग कॅन्सरच्या रुग्णांना जास्त होईल. आपण सर्वांनीच हे करायला हवं.

मयूर पवार, साठ्ये कॉलेज

समाजसेवा

संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता यायचं नाही. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतं. रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा घटक वाया जाईल असं काहींना वाटतं. पण तसं नाहीय. रक्तदानानंतर काही तासांतच आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्तदानातून उत्तम समाजसेवा करता येते.

सलोनी मोरे, पाटकर कॉलेज

चांगलं काम

मी जेव्हा पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा, आपण एक चांगलं काम केलंय अशी जाणीव मनातून झाली. आपल्या देशात अनेक अपघात होत असतात. त्यात जखमी होणाऱ्यांना रक्ताची तातडीची गरज लागत असते. त्या अपघातग्रस्ताला वेळेवर रक्त उपलब्ध झालं तर त्याचा जीव वाचतो. रक्त कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये निर्माण करता येत नाही. त्यामुळे आपण रक्तदान करून अपघातग्रस्तांचा, रुग्णांचा जीव वाचवला पाहिजे.

गौरव अटपाडकर, आचार्य कॉलेज

सार्थ अभिमान

वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क मिळतो. त्याचा आनंद काही और असतो. मला असा आनंद मिळाला तो मी जेव्हा पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा. मी खऱ्या अर्थानं सज्ञान झालो अशी जाणीव मला झाली. हजारो रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. रक्तदान करण्याआधीची भीती मला देखील होती. मात्र एकदा रक्तदान केल्यानंतर झालेला आनंद अतुलनीय होता. आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकेल याचा सार्थ अभिमान वाटतो. हा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो.

वैषाली कानेकर, रुईया कॉलेज

संकलन : रिद्धी बांदिवडेकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज