अ‍ॅपशहर

बॅकस्टेजसाठी ‘शिकस्त’

कॉलेजच्या एकांकिकांच्या टीममध्ये एखादी भूमिका पटकावण्यासाठी चढाओढ असते. रुचिता मळेकर या विद्यार्थिनीनं मात्र रस घेतलाय तो पडद्याआडच्या कामांमध्ये. नाटकांसाठी प्रकाशयोजना, ध्वनी आणि वेशभूषा या गोष्टी शिकून घेऊन त्यातच करिअर करण्याचा तिचा विचार आहे...

Maharashtra Times 20 Jun 2018, 12:33 pm
विनय राऊळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ruchita-malekar


कॉलेजच्या एकांकिकांच्या टीममध्ये एखादी भूमिका पटकावण्यासाठी चढाओढ असते. रुचिता मळेकर या विद्यार्थिनीनं मात्र रस घेतलाय तो पडद्याआडच्या कामांमध्ये. नाटकांसाठी प्रकाशयोजना, ध्वनी आणि वेशभूषा या गोष्टी शिकून घेऊन त्यातच करिअर करण्याचा तिचा विचार आहे...

कुठल्याही नाटकामध्ये बॅकस्टेजला काम करणाऱ्यांची 'भूमिका'ही खूप महत्त्वाची असते. बॅकस्टेजच्या कामांकडे मुली फारशा वळत नाहीत. पण, रुचिता मळेकर या तरुणीनं मात्र याच कामांवर 'फोकस' केला आहे. 'शिकस्त-ए-इश्क' या प्रायोगिक नाटकासाठी ध्वनीमुद्रण आणि वेशभूषा ही जबाबदारी रुचिता सांभाळते आहे. या नाटकाची संपूर्ण टीमच कॉलेज विद्यार्थ्यांची आहे. कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांसाठी तिनं ही जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली असल्यानं या नाटकासाठीही तिच्यावर ती जबाबदारी देण्यात आली.

रुचिता पनवेलच्या पिल्लई कॉलेजची विद्यार्थिनी. रुचिता बीएससी आयटीचं शिक्षण घेतेय. 'शिकस्त...' हे तिचं पहिलंच नाटक. या नाटकाचे आजवर जवळपास सात-आठ प्रयोग तिनं केले आहेत. ती म्हणाली, की 'नाटकाच्या बॅकस्टेजच्या या गोष्टी मी खास असं कुठून शिकले नव्हते. कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून मी सीनिअर्सबरोबर काम करता-करताच शिकले आहे. प्रत्यक्ष काम करताना त्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या. कॉलेजमध्ये असताना मी युथ फेस्टिव्हलपासून सुरुवात केली होती. त्यावेळी आपल्या कॉलेज ग्रुपमधूनच कुणा एकाला ध्वनीमुद्रण आणि वेशभूषेची जबाबदारी घ्यावी लागायची. त्यामुळे तेव्हापासूनच माझा हा प्रवास हा सुरू झाला आहे.'

वेशभूषेबद्दल सांगायचं झालं, तर कॉलेजची टीम स्वतःच वेशभूषेची व्यवस्था करायची. कधी कुणाच्या घरातून, तर कधी मित्र-मैत्रिणींकडून वेशभूषेची सोय केली जाते. ही जबाबदारी रुचितानं सांभाळली आहे. ध्वनीमुद्रणाच्या कामाबरोबरच तिनं प्रकाशयोजनेचं कामही शिकून घेण्यास सुरुवात केली आहे. यातले बारकावे समजून घेण्यासाठी काही व्यावसायिक नाट्यप्रयोगांना ती जात असते. 'प्रत्यक्ष कामांमधून जो अनुभव मिळतो त्यातून अजून काही वेगळं शिकायला मिळतं. पुढे या क्षेत्रातच करिअर करायचा तिचा विचार आहे. नाटकासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टींची आणखी माहिती घेणार आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये माझ्या घरच्यांचा पाठिंबा मिळणं माझ्यासाठी फार महत्वाचं होतं', असं रुचितानं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज