अ‍ॅपशहर

आम्ही निसर्गप्रेमी

विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे धडे मिळावेत म्हणून अनेक कॉलेजांचे नेचर क्लब सध्या विविध उपक्रम राबवत आहेत. ट्रेक, एकदिवसीय सहल, फुलपाखरांसाठी खास बाग तयार करणं असे निसर्गाच्या सान्निध्यातले अनोखे उपक्रम विद्यार्थी नेचर क्लबच्या अंतर्गत राबवत आहेत. अशाच मुंबईतील कॉलेजांमधल्या नेचर क्लब आणि त्यांच्या उपक्रमांचा घेतलेला आढावा...

Maharashtra Times 17 Jan 2017, 12:11 am
विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे धडे मिळावेत म्हणून अनेक कॉलेजांचे नेचर क्लब सध्या विविध उपक्रम राबवत आहेत. ट्रेक, एकदिवसीय सहल, फुलपाखरांसाठी खास बाग तयार करणं असे निसर्गाच्या सान्निध्यातले अनोखे उपक्रम विद्यार्थी नेचर क्लबच्या अंतर्गत राबवत आहेत. अशाच मुंबईतील कॉलेजांमधल्या नेचर क्लब आणि त्यांच्या उपक्रमांचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nature clubs in mumbai colleges
आम्ही निसर्गप्रेमी

एच. आर. कॉलेज, चर्चगेट
चर्चगेटच्या एच. आर. कॉलेजमधले नेचर क्लब नेहमी काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी करत असतं. यंदा हिवाळ्यामध्ये त्यांनी शिवडीच्या खाडीत जाऊन फ्लेमिंगो पक्ष्यांचं निरीक्षण केलं. तसंच विद्यार्थ्यांच्या पसंतीवरून 'बर्ड वॉचिंग'साठी ते पुन्हा एकदा सज्ज आहेत. त्याचप्रमाणे फुलपाखरांसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रोपं लावून कॉलेजची बाग फुलवली आहे. जानेवारी महिन्यातली गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी विद्यार्थी ट्रेकला जाण्याचा विचारही करत आहेत.
विल्सन कॉलेज, चर्नी रोड
विल्सन कॉलेजमधल्या नेचर क्लबची खासियत म्हणजे क्लबमधील विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलता यावा यासाठी त्यांना मनाली, लेह-लडाख अशा ठिकाणी ट्रेकसाठी नेलं जातं. त्याचबरोबर तिथे 'जंगल सफारी', 'स्टार गेझिंग', 'ऍडवेंचर स्पोर्ट्स', 'वृक्षरोपप' असे अनेक उपक्रम देखील राबवले जातात. संगीतातून निसर्गाविषयी मत मांडण्याचं एक हटके म्युझिक सेशनदेखील ते घेतात. अशा प्रकारचे ट्रेक हे प्रामुख्याने हिवाळ्यात नेल्या जातात. यंदाच्या थंडीत देखील ते कुलूमनालीच्या निसर्गसौंदर्याचा अस्वाद घेणार आहेत आणि त्याचबरोबर 'बर्ड वॉचिंग' सारखं उपक्रम राबवणार आहेत.
भवन्स कॉलेज, अंधेरी
अंधेरी येथील भवन्स कॉलेजमध्ये 'भवन्स नेचर अँड एडवेन्चर सेंटर' आहे. जिथं नेहमी निसर्गाशी संबंधित अनेक गोष्टी केल्या जातात. हिवाळ्यामध्ये काही तरी वेगळं करण्याच्या उद्देशाने नेचर क्लबमधील विद्यार्थांनी कॅम्पसमधील विविध पक्ष्यांचा आणि त्यांच्या आवाजाचा शोध घेतात. विशेष म्हणजे आतापर्यंत पन्नासपेक्षाही अधिक पक्ष्यांच्या जाती येथे आढळल्या आहेत. त्याव्यतिरिक्त दर रविवारी नॅशनल पार्कमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात दुर्मिळ वनस्पतींच्या आणि पक्ष्यांच्या शोधात हे पर्यावरणप्रेमी रममाण होतात.
पोदार कॉलेज, माटुंगा
डिसेंबर महिन्यात पोद्दार कॉलेजच्या नेचर क्लबने 'सांधण व्हॅली'ला पूर्ण एका दिवसाची ट्रिप नेली होती. ज्यात ट्रेकिंग, स्टार गेझिंग करून विद्यार्थ्यांनी हिवाळ्याच्या आनंद लुटला. या ट्रेकमध्ये अनेक प्रकारच्या मुख्यतः थंडीत वाढणाऱ्या झाडांची त्यांना माहिती मिळाली. असेच अनेक अविस्मरणीय प्रसंग त्यांनी अनुभवले. थंडीत नेलेल्या या कॅम्पमुळे मुलांना एक वेगळीच मज्जा आणि अनेक नैसर्गिक बदल अनुभवायला मिळाले. हिवाळ्यात त्यांचे अजून काही नवनवीन उपक्रम राबण्याचा विचार आहे.
शैलेंद्र कॉलेज, दहिसर
शैलेंद्र कॉलेजच्या नेचर क्लब आणि एन. एन. एस. यूनिटने, सहल आणि त्याचप्रमाणे समाज प्रबोधन हे दोन्ही हेतू साधून खास थंडीच्या निमित्ताने कामण याठिकाणी भेट दिली. प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि त्याच बरोबर जैविक खताचा योग्य वापर अशा विविध सोप्या आणि सहज गोष्टींबद्दल सविस्तर माहिती तेथील स्थायिकांना दिली. या छान गुलाबी मौसमात फुलपाखरांसारखे सुंदर रंगबेरंगी प्राणी कम्पसमध्ये येण्यास सज्ज असतात. त्यांच्या स्वागतासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फुलपाखरांसाठी खास बाग तयार केली आहे.
संकलन : दीपाली बुद्धिवंत, प्रांजली शेणॉय, सायली जाधव, प्रियांका गवळी, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज