अ‍ॅपशहर

पुस्तकांच्या कामासाठी प्राध्यापकच मिळेना!

आयडॉलच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये चुका असल्याचं मुंटानं नुकतंच समोर आणलं. त्यानंतर आता, विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचं काम करण्यासाठी प्राध्यापक मिळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अभ्यास करायचा तरी कसा हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे…

सौरभ शर्मा | Maharashtra Times 18 Apr 2017, 3:09 am
आयडॉलच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये चुका असल्याचं मुंटानं नुकतंच समोर आणलं. त्यानंतर आता, विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचं काम करण्यासाठी प्राध्यापक मिळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अभ्यास करायचा तरी कसा हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no professor for idol work
पुस्तकांच्या कामासाठी प्राध्यापकच मिळेना!


दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) विद्यार्थ्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. विद्यार्थ्यांच्या विविध स्टडी मटेरिअलचं काम करण्यासाठी आयडॉल प्रशासनाला प्राध्यापकच मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळेच पुस्तकांतल्या चुकांची संख्या वाढल्याची माहिती आयडॉलच्या एका उच्च अधिकाऱ्याने ‘मुंटा’ला दिली.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं शिक्षण दिलं जातं. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण अपुरं राहिलं असेल, त्यांच्यासाठी किंवा काम करून शिकणाऱ्यांसाठी आयडॉल म्हणजे सुवर्णसंधीच असते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना संबंधित अभ्यासक्रमांची पुस्तकं अभ्यासासाठी दिली जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा अभ्यास करून मग परीक्षा द्यायची असते. मात्र ही पुस्तकं तयार करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्राध्यापकच मिळत नसल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे.

अनेक प्राध्यापकांना पुस्तकं तयार करण्यासाठी फार कमी वेळ दिला जातो. त्यामुळे या पुस्तक निर्मितीच्या कामांना अनेक प्राध्यापक नकार देत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही प्राध्यापकांना या अगोदरचं मानधन न देण्यात आल्याने प्राध्यापक आयडॉलकडे फिरकत नसल्याची माहितीही यानिमित्तानं समोर आली आहे.
आयडॉलच्या पुस्तक निर्मितीसाठी होत असलेल्या गोंधळास कॉलेजांनाही लक्ष्य केलं जात आहे. मुंबईतल्या अनेक कॉलेजांमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुस्तकांचं काम कोणाकडे द्यायचं असा प्रश्न अभ्यास मंडळाला पडतो आहे. हे काम प्राध्यापकाकडे सोपवून करून घेण्यात मंडळाची दमछाक होतेय. त्यामुळेच पुस्तकांचा दर्जा घसरत असल्याची माहिती यावेळी सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान आयडॉलच्या या पुस्तकांबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. मात्र त्यानंतरही त्यांच्या तक्रारींची साधी दखल घेण्यात न आल्याची टीका करण्यात येते आहे. याबद्दल आयडॉलच्या संचालिका डॉ.अंबुजा साळगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

पुस्तकांची छाननी करा
आयडॉलच्या विद्यार्थ्यांना वेळेवर स्टडी मटेरिअल देण्यात यावं. यासाठी आम्ही कित्येकदा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यानंतरही विद्यापीठ त्याकडे काणाडोळाच करत आहे. पुस्तकांचीच जर अशी अवस्था असेल, तर त्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार हे नक्की. त्यामुळे आयडॉलच्या सर्व पुस्तकांची योग्य ती छाननी करावी, अशी मागणी आम्ही कुलगुरूंकडे करणार असल्याची माहिती मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी दिली.

आम्हाला कळवा
आयडॉल असेल किंवा मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही प्रकारच्या गलथान कारभाराचा फटका तुम्हालाही बसला असेल तर मुंटाला जरुर कळवा. योग्य त्या तक्रारीला जरुर वाचा फोडली जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज