अ‍ॅपशहर

pubg mobile game:पबजीचा विळखा! विद्यार्थ्यांच्या कॉलेजला दांड्या

पबजी या एका शब्दानं तरुणाईच्या विश्वात धुमाकूळ घातलाय. या खेळाचा विळखा घट्ट होत चालला असून, रात्रं-दिवस तो खेळणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत चालली आहे. या गेमच्या नादात मुलं कॉलेजांना 'नो जी' म्हणू लागली आहेत. काही वेळा तर जीवावर बेतण्यापर्यंत वेळ येतेय. या गंभीर विषयावर 'मुंटा'नं टाकलेला दृष्टीक्षेप...

Maharashtra Times 27 Nov 2018, 12:00 pm
प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pubg-game


पबजी या एका शब्दानं तरुणाईच्या विश्वात धुमाकूळ घातलाय. या खेळाचा विळखा घट्ट होत चालला असून, रात्रं-दिवस तो खेळणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत चालली आहे. या गेमच्या नादात मुलं कॉलेजांना 'नो जी' म्हणू लागली आहेत. काही वेळा तर जीवावर बेतण्यापर्यंत वेळ येतेय. या गंभीर विषयावर 'मुंटा'नं टाकलेला दृष्टीक्षेप...

दहावीला चांगले मार्क्स मिळाल्यावर सुजयला (नाव बदललं आहे) अकरावीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पालकांनी त्याला नवा मोबाइल फोन घेऊन दिला. मित्रांबरोबर 'पबजी'शी त्याची ओळख झाली. मग काय, दिवसभर, रात्र-रात्र जागून पबजी खेळणं सुरू झालं. रात्रीच्या जागरणामुळे कॉलेजच्या अटेंडन्सवर परिणाम व्हायला लागला. आई-वडील दोघेही नोकरी करणारे असल्यानं त्यांना याची कल्पना नव्हती. हा प्रकार कळताच ते देखील चक्रावले. अखेर जबरदस्तीनं त्याला कॉलेजला पाठवण्यात आलं. मात्र त्या संध्याकाळी तो घरी परतलाच नाही. शोधाशोध केल्यावर मित्रांसोबत तो पबजी खेळताना आढळला. पबजीच्या वेडापायी आई-वडिलांच्या अंगावर धावून जाणं, हिंसक होणं अशा गोष्टी घडू लागल्या. शेवटी मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्यात येऊन सुजयला पबजीच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुजयसारखी अनेक उदाहरणं सध्या आजुबाजूला पाहायला मिळताहेत.

'आमचा मुलगा मोबाईलमध्ये हुशार हो, दिवसभर काहीतरी सर्फिंग करत असतो' असं सांगत पालक लहानपणीच पाल्याच्या हातात मोबाइल टेकवतात. पण त्या मोबाईलचा नेमका वापर कसा करायचा हे सांगायला मात्र विसरतात. त्यामुळे पबजीसारख्या खेळाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अलीकडे हजारो विद्यार्थी या खेळात गुंतले आहेत. मिळेल तिथे, तसंच ऑनलाइन आपला ग्रुप बनवून ही मुलं पबजी खेळत असतात. यामध्ये आपला पाल्य तर नाही ना याची खबरदारी घेण्याची गरज पालकांची आहे असं मानसोपचारतज्ज्ञ सांगताहेत.

वेळीच सावध व्हा

पबजीमुळे पालक-विद्यार्थी यांच्यातला संघर्ष वाढू लागलाय. हा गेम खेळणारे विद्यार्थी अचानक हिंसकवृत्तीचे बनत असल्यानं, गेम खेळू न दिल्यास कळत नकळत पालक आणि मुलांमध्ये खटके उडतात. काही वेळा तर मारहाणीपर्यंत वेळ येत असल्याचं चित्र अनेक घरांत दिसून येऊ लागलंय. अशी परिस्थिती तुमच्या घरात उद्भवत असेल, तर वेळीच मानसोपचारतज्ज्ञ अथवा समुपदेशकाकडे जायला हवं.

पालकांनी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी ते सांगतायत सोशल मीडिया एक्सपर्ट सोनाली पाटणकर

० आपला पाल्य ११ ते १७ या वयोगटातला असल्यास तो कुठला गेम खेळतोय याकडे पालकांनी स्वतः लक्ष द्यावं. त्यानं काय खेळावं याचा निर्णय देखील वेळप्रसंगी घ्यावा.

० अठरा वर्षांपुढील, तसंच कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांशी सतत संवाद ठेवावा. अतिखेळामुळे काय दुष्परिणाम होतात याची जाणीव त्यांना करून द्या.

० आपला पाल्य दिवसातले किती तास गेम खेळतोय याकडे लक्ष द्या.

० पाल्य पबजीच्या विळख्यात अडकला असेल, तर त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचारांची गरज आहे हे ओळखा.

पबजी खेळाचे दुष्परिणाम हल्ली खूप वेगानं वाढताना दिसताहेत. हा गेम खेळायला सुरुवात केल्यावर, तो खेळतच राहावा अशा पद्धतीनं त्याची बांधणी करण्यात आली असल्यानं विद्यार्थी त्यामध्ये अडकत आहेत. गेमचा गाभाच हिंसक असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय. हा गेम खेळताना स्वतःसाठी वेळेची मर्यादा घालायला हवी. गेमपासून दूर राहणं हा तर सर्वात उत्तम उपाय.

- डॉ. सागर मुंदडा, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ

पबजीचं वेड कॉर्पोरेट्समध्ये आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कसं पसरलंय ते वाचा उद्याच्या अंकात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज