अ‍ॅपशहर

गोंधळाचा अंक सुरूच

मुंबई विद्यापीठ आणि गोंधळी कारभार हे जणू ठरलेलं समीकरण झालं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या सुरू झालेल्या परीक्षांमध्येसुद्धा गोंधळाचा अंक बघायला मिळतोय. यंदाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना नेमका कसा मनस्ताप होतोय त्यावर टाकलेली एक नजर…

Maharashtra Times 17 Nov 2017, 2:59 am
आदित्य बिवलकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problems of mumbai university
गोंधळाचा अंक सुरूच


मुंबई विद्यापीठ आणि गोंधळी कारभार हे जणू ठरलेलं समीकरण झालं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या सुरू झालेल्या परीक्षांमध्येसुद्धा गोंधळाचा अंक बघायला मिळतोय. यंदाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना नेमका कसा मनस्ताप होतोय त्यावर टाकलेली एक नजर…

हॉलतिकीटाचा गोंधळ
विद्यार्थ्यांना उशिरानं मिळणारं हॉलतिकीट आणि त्याचं चुकीचं नियोजन यामुळे यंदा हॉलतिकीटचा मोठा गोंधळ बघायला मिळाला. बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा शेवटचा पेपर होईपर्यंत हॉलतिकीट्स मिळालेले नव्हते. संस्कृत विषय घेऊन बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीटामध्ये पॉलिटिकल सायन्सचा विषय आला होता. चुकीचे सीट नंबर्स, कोर्सपेक्षा वेगळे विषय यामुळे परीक्षेआधी विद्यापीठानं विद्यार्थ्यांना कोड्यात टाकलं होतं.

अर्ध्या तासाचा विलंब
बऱ्याच ठिकाणी परीक्षा उशिरानं सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळालं. परीक्षा केंद्रावर असणारा भार, वेगवेगळ्या विषयांच्या सुरू असलेल्या परीक्षा, त्यांच्या छायाप्रतींचे नियोजन, प्रश्नपत्रिकांचं वाटप यामुळे बऱ्याच कॉलेजांमध्ये बीकॉम, बीएमएम यांच्या परी जवळपास अर्ध्या तास उशिरानं सुरू झाल्या. याचबरोबर यादरम्यान काही ठिकाणी पेपर फुटल्याच्या आणि पेपर व्हायरल होण्याच्या घटनासुद्धा समोर आल्या होत्या. मात्र विद्यापीठाकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पेपरमध्ये असंख्य चुका
यंदाच्या परीक्षेतल्या पेपर्समध्ये अनेक चुका बघायला मिळाल्या. त्यातच पेपरमधल्या करेक्शन्स येण्यासाठीसुद्धा वेळ लागत होता. बीएमएमच्या मराठीच्या विद्यार्थ्यांना काही ठिकाणी मराठीऐवजी इंग्रजी प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. ट्रान्सलेटर उपलब्ध करून कॉलेजना व्यवस्था करावी लागली. तसंच फिचर आणि ओपिनियन या पेपरमध्ये बीएमएमच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रश्नाला ऑप्शनच देण्यात न आल्याने जवळपास ४५ मिनिटांचा पेपरचा वेळ वाया गेला.

कॉलेजचं वेळापत्रक बिघडलं
एकाच वेळी एकत्र आलेल्या परीक्षांमुळे कॉलेजचं वेळापत्रक चांगलंच बिघडल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था तयार करणं, त्याचं नियोजन करून शिक्षकांची नेमणूक करणं या सगळ्यात कॉलेजचा भरपूर वेळ वाया गेला. सर्व परीक्षांमध्ये पर्यवेक्षण करण्यासाठी शिक्षक कसे नेमावेत असा प्रश्न कॉलेजना पडला होता. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांची लेक्चर्स अखेर रद्द करावी लागली. अखेर व्हिजिटिंग प्रोफेसर्स, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचीही मदत घ्यावी लागली.

अभ्यासक्रम अपूर्णच
उशिरानं सुरू झालेले शैक्षणिक वर्ष, त्यातच असेसमेंटचे काम आणि सुट्ट्या या सगळ्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वेळापत्रकात थोडेफार बदल केले असले, तरीही कॉलेजमध्ये अभ्यासक्रमच पूर्ण झालेला नसताना विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागलं.

अफवांमुळे संभ्रम
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबद्दलच्या अफवा यंदाच्या परीक्षेत खूप फिरत होत्या. या अफवांनी शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकलं होतं. विद्यापीठाच्या नावाचे खोटे इ मेल्स, खोटे फोटो तयार करून व्हायरल करण्यात आले होते. मात्र याबद्दल कॉलेजला विद्यापीठाकडून माहिती दिली गेली नसल्यानं गोंधळ वाढल्याचं दिसून येत होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज