अ‍ॅपशहर

लव्हस्टोरीचा सोशल फंडा

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, हे आपल्याला कितीही पटत असलं, आजकालच्या पिढीची मात्र प्रेम करण्याची पद्धतच काही न्यारी आहे...

Maharashtra Times 26 Sep 2018, 4:20 pm
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, हे आपल्याला कितीही पटत असलं, आजकालच्या पिढीची मात्र प्रेम करण्याची पद्धतच काही न्यारी आहे. प्रेमातल्या भावना तशाच असल्या, तरी त्या व्यक्त करण्याचा ट्रेंड बदललाय. 'सबकुछ ऑनलाइन'च्या जमान्यात या गोष्टीही ऑनलाइन झाल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lovestory


००००

प्रतीक गंगेले

तुला वाटेल तसं वाग, मला फक्त तू हवी आहेस... देव करो नकळत असं घडावं, की तूही माझ्या प्रेमात पडावं.. एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करतं ते खरं प्रेम... इट्स ओव्हर ही वाक्यं वाचून तुम्हाला अंदाज आलाच असेल, की हा सगळा प्रेमाचा मामला आहे. हा कुणा दोन व्यक्तींमधील संवाद नाही, तर जगजाहीर केलेली फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेट्स आहेत. प्रेमापासून ब्रेकपर्यंतच्या भावना व्यक्त करण्याचं आता हे एक नवीन माध्यमच आहे.

आजकाल प्रेम करणं किंवा ब्रेकअप करणं याचे नवनवीन ऑनलाइन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. प्रेमाच्या गोष्टी त्याच असल्या तरी, बदलते आहे ती पद्धत. प्रेमात पडण्यापासून ते ब्रेकअप होण्यापर्यंत सर्वच गोष्टी व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक स्टेटसमधून दिसत आहेत. विशेष म्हणजे, प्रेम व्यक्त करण्यापासून संपवण्यापर्यंत तरुणाईनं या सोशल नेटवर्किंगला आपलं हक्काचं माध्यम बनवलं आहे.

अगदी ६-७ वर्षांपूर्वी कुणी तासनतास फोनवर बोलत असलेलं दिसलं, की हा प्रेमाचा मामला आहे हे इतर समजून घ्यायचं; पण आजच्या जनरेशनचा प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेंड बदलतोय. यावर कृपा आहे ती टेक्नॉलॉजीची. सोशल नेटवर्किंगमुळे तर चोवीस तास कनेक्टेड आणि कम्प्लिट प्रायव्हसी, असं चित्र दिसू लागलं आहे. प्रत्यक्ष भेट कमी; पण संपर्कात २४ बाय ७. हे सगळं सहज साध्य करुन देणारे व्हॉट्सअॅप, फेसबुक, हाइक तरुणाईसाठी जणू जीव की प्राण झाले आहेत. प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवर बोलण्यापेक्षा चॅटिंग, कमेंटिंगलाच अधिक प्राधान्य दिलं जात आहे. त्यातच बोलण्या-भेटण्यात कशाला अधिक वेळ आणि पैसा घालवा, हा व्यावहारिक दृष्टिकोनही प्रेमात दिस‌तोय. त्यामुळे कमी पैशात किंवा मोफत उपलब्ध असलेल्या या सोशल साइट्सवरच ही प्रेमप्रकरणं बहरू लागली आहेत आणि कोमेजूही लागली आहेत.

केवळ प्रेमच नाही, तर ब्रेकअप्सही आता ऑनलाइन जाहीर होऊ लागली आहेत. पूर्वी एखाद्याचा प्रेमभंग अर्थात ब्रेकअप म्हणजे मोठ दिव्य असायचं. भांडणं, मारामाऱ्या, खुन्नस, धमक्या हे ठरलेलंच असायचं. ब्रेकअप झाल्यानंतर त्यातून सावरायलाही महिन्यांपासून वर्षभराचा कालावधी घेतला जायचा. आता तेही ऑनलाइन होतंय. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा इट्स ओव्हर, ब्रेकअप, गूड बाय अशा आशयाचा फक्त एक मेसेज पाठवला जातो. बरं ब्रेकअप झाल्यानंतर जणू काही झालंच नाही या आविर्भावात सोशल साइट्सवर अनेकांचा 'प्रेझेन्स' असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज