अ‍ॅपशहर

अतूट मैत्रीचा त्रिकोण

आता आम्ही विश्रांतवाडीत, नामजोशी धायरीत, तर जोगळेकर चिंचवडला राहातो. दूर असलो,तरी आमचा हा त्रिकोण अतूट मैत्रीच्या रेषांनी तीन ‌बिंदूना एकत्र सांधलेला आहे.

Maharashtra Times 15 Nov 2016, 3:00 am
कधी मनात आलं म्हणून केली मैत्री असं होत नाही किंवा कुठंतरी कुणाजवळ मागूनही ती मिळत नाही. एकमेकांची मनं जुळली तरच खरी मैत्री होते आणि हाच आमच्या कुटुंबाला अनुभव आला आहे. आमची ही यारी त्रिकोणी म्हणजेच तीन कुटुंबाची आहे. ती इतकी घट्ट आहे, की परिचयाच्या लोकांना वाटतं, की आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. आमचे गेल्या जन्मापासूनचे ऋणानुबंधन आहेत, असंच आम्हा तिनही कुटुंबाला वाटतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम friendhsip
अतूट मैत्रीचा त्रिकोण

खरं तर, आम्ही म्हणजे फाटक विश्रांतवाडीत, नामजोशी, जोगळेकर टिंगरेनगरला राहात होतो. आमची प्रथम तोंडओळख झाली ती ‘वर्षा’ वाचनालयात. आम्हा सगळ्यांनाच वाचनाचा छंद होता. सन ८५, ८६ सालची गोष्ट. ती दोन्ही कुटुंबं आणि आम्ही दोघं वाचनालयात योगायोगानं दोन-तीन वेळा एकाच वेळी पुस्तक बदलण्यास गेलो, तेव्हा आमचं नाव-आडनाव विचारण्याइतपत जुजबी बोलणं झालं होतं; पण नंतर नामजोशी, जोगळेकर आमच्या घरी किंवा आम्ही त्यांच्या घरी येऊ-जाऊ लागलो.
नामजोशींना दोन्ही मुलींच्या शाळेच्या वेळा सांभाळून जास्त वेळ आमच्याकडे येणं जमत नसे. जोगळेकर मात्र आमच्याकडे बरेच वेळा यायचे. त्यांच्याशी आमच्या मुलांचीही खूप छान जवळीक झाली होती. ते घरी आले आणि परत जाण्यास निघाले, की मुलं हिरमुसायची. त्यांना राहाण्याचा चक्क आग्रहही करायची. ते त्यांना आपल्या खऱ्या काका-काकूसारखेच मानत. अजूनही मानतात. ते आई-वडिलांकडे एकवेळ हट्ट करणार नाहीत, इतका त्यांच्या जवळ करतात. वेळ प्रसंगी रुसतात, चिडतात; पण त्यांच्यापैकी कुणाला बरं नसलं, की तेवढीच काळजीही करतात.
आमच्या घरातील सुख-दुःखात ते घरच्यांसारखेच किंबहुना जास्तच समरस होतात. आम्ही आमची मनं एकमेकींजवळ मोकळी करतो. ते आणि आम्ही घराचाच एक अविभाज्य असा भाग आहे. आता आम्ही विश्रांतवाडीत, नामजोशी धायरीत, तर जोगळेकर चिंचवडला राहातो. दूर असलो, तरी आमचा हा त्रिकोण अतूट मैत्रीच्या रेषांनी तीन ‌बिंदूना एकत्र सांधलेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज