अ‍ॅपशहर

रम्य त्या शाळेच्या आठवणी

२९ जानेवारी २०१७ रोजी सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा करण्याचं योजलं आहे. पाहूयात, आता या मेळाव्याच्या निमित्तानं कितीजण एकत्र येतात आणि शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रमतात ते.

Maharashtra Times 11 Jan 2017, 3:00 am
१९६६-६७ साली म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड इथून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा एकत्र घेण्याचा विचार मनामध्ये येताच डोळ्यासमोरून ५० वर्षांपूर्वीच्या गतस्मृती जाग्या झाल्या. खरंच रम्य ते बालपण, कोणतीही चिंता नाही, शाळा सुरू होण्याअगोदर आणि मधल्या सुट्टीत गोट्या खेळणं, फरशीचे तुकडे एकत्र रचून केलेली लगोरी, अप्पारप्पी, क्रिकेट खेळताना जो आनंद होता, तो आत्ताच्या वर्ल्डकपलाही नाही. खरंच, ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन!’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम katta gang friendship
रम्य त्या शाळेच्या आठवणी

वास्तविक आमच्या टेक्निकल ११ वी क तुकडीचे माजी विद्यार्थी दरवर्षी १ जानेवारीला माझ्या हॉटेलमध्ये संध्याकाळी ६ वाजता एकत्र जमतो. गप्पाटप्पा मारून झाल्यानंतर रात्री एकत्र जेवणासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो. अविनाश जोशींनी कल्पना मांडली, की आपल्या शाळेतील १९६७ सालातील सर्व पाच तुकडीचे माजी विद्यार्थी एकत्र आलो, तर किती मजा येईल? कल्पना छानच आहे, मात्र ५० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा शोध कसा घेणार? त्यासाठी गुळगुळे, जोशी शाळेमध्ये गेले आणि ६७ साली ११वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावं रजिस्टरमधून शोधून लिहून आणली.
नावं मिळाली; पण त्यांचे पत्ते, फोन नंबर काही नव्हतं. मग एकमेकांना विचारून, मित्रांची नावं सांगून त्यापैकी कुणी एकमेकांना भेटता का, आता कुठं राहातात याची माहिती काढण्याचा द्राविडी प्राणायम सुरू झाला. सतत प्रयत्न करून सुमारे तीन महिन्यांमध्ये २५० विद्यार्थींपैकी जवळजवळ १०० माजी विद्यार्थी सापडले. बाकीच्यांचा शोध अजून सुरू आहे.
आम्हाला त्यावेळी शिकवण्यासाठी जे शिक्षक-शिक्षिका होते, त्यांनी दिलेल्या ज्ञान आणि संस्कारामधूनच आमची पिढी सुसंस्कृत, उच्चशिक्षित झाली. त्या ऋणातून मुक्त होता येणार नाही; परंतु आता आपणही शाळेसाठी काही देणं लागतो, या विचारानं आम्ही पाच-सहा माझी विद्यार्थी शाळेतील मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी गेलो आणि शाळेसाठी काही मदत करू का याची विचारणा केली. चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी ३१ वर्गांना लोखंडी मोठं कपाट दिल्यास त्यामध्ये स्वाध्याय आणि निबंधाच्या वह्या ठेवल्यास त्याचं ओझं कमी होईल. उंच आणि स्थूल मुलांना बसण्यासाठी जे बाक आहेत ते गैरसोईचे आहेत. त्यामध्ये बदल करून त्यांची उंची वाढवल्यास सोईचं होईल. मग आम्ही प्रत्येक वर्गातील शेवटच्या ओळीतील चार बाकांची उंची वाढवून नवीन रंगकाम करून घेतलं. काचाही दुरूस्त करून घेतल्या.
रियुनयनसाठी विद्यार्थ्यांची शोधमोहिम मागील तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हॉटेल अशोका इथं संध्याकाळी ६.३० वाजता सर्व एकत्र भेटतो. त्यावेळी नवीन सापडलेल्या विद्यार्थ्यांची ओळखपरेड खूपच गंमतीशीर असते. काही विद्यार्थी पुण्याबाहेर आणि काही देशाबाहेर गेल्याचं समजलं. त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. २९ जानेवारी २०१७ रोजी सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा करण्याचं योजलं आहे. पाहूयात, आता या मेळाव्याच्या निमित्तानं कितीजण एकत्र येतात आणि शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रमतात ते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज