अ‍ॅपशहर

शिष्ट ते शिस्त

लग्नानंतर किंवा करिअरनिमित्त दूर देशी गेल्यावर वेगळ्या संस्कृतीशी ओळख होते. तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेताना आपण त्यामध्ये रुळतो. तुम्हीही असं अनुभवलं आहे का?

Maharashtra Times 23 Sep 2017, 3:42 am
लग्नानंतर किंवा करिअरनिमित्त दूर देशी गेल्यावर वेगळ्या संस्कृतीशी ओळख होते. तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेताना आपण त्यामध्ये रुळतो. तुम्हीही असं अनुभवलं आहे का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nidedita kulkarni
शिष्ट ते शिस्त


दोन वर्षांपूर्वी शिक्षणानिमित्त मी कॅनडा गाठलं. तिथं गेल्यावर एकप्रकारे मला कल्चरल शॉक मिळाला. कॅनडामध्ये 'प्लीज' आणि 'थँक यू' हे दोन शब्द सर्रास वापरले जातात. मुंबईत लहानाची मोठी झाल्यानं मला या सगळ्या शिष्टाचाराची सवय नव्हती. त्यामुळे सुरुवातीला अनेकदा इथल्या लोकांना मी उर्मट वाटायचे. पण हा केवळ संस्कृतींमधला फरक होता हे आता मला समजलंय. इथं जोरात बोलणं हासुद्धा उद्धटपणा समजला जातो. अशावेळी हळू आवाजात मृदू बोलण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. अर्थात मी या सगळ्यांशी हळूहळू जुळवून घेतलं. आता विनम्रपणे बोलतानाचं ऐकताना आई-बाबांना आश्चर्य मिश्रित आनंद होतो. शिष्ट ते शिस्तचा हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरलाय.

इथल्या संस्कृतीशी जुळवून घेताना आणखीन एक मोठं आव्हान म्हणजे जेवण. इथं अनेक भारतीय रेस्तराँ आहेत. पण इथं बटर चिकन, नान, मटण करी असंच मिळतं. मला पण एखाद्या पोळीभाजी केंद्रात मिळतं तशी वरण, भात, भाजी, पोळी असं अन्न खायची कायम इच्छा होते. दोन नोकऱ्या, इंटर्नशिप आणि कॉलेज अशी तारेवरची कसरत असताना स्वयंपाक करणं शक्य होत नाही. त्यामुळे कॅन्ड प्रोसेस्ड पदार्थ खावं लागलं ज्यानं वजन वाढलं. अखेर या सगळ्याला वैतागून मी शिस्त लावायचं ठरवलं. सध्या मी मध्यम मार्ग शोधून काढलाय. मला सुट्टी असली की, मी २-४ दिवसांचा स्वयंपाक बनवून तो फ्रीजमध्ये ठेवते. भूक लागेल तसं ते डीफ्रॉस्ट करते. हे योग्य नाहीय मला माहितेय पण घरचं अन्न खायचं म्हटंल्यावर याला पर्याय नाही! अन्नावरून विशेषतः सांगावंसं वाटतं ते म्हणजे माझ्यासोबत दोन फिलिपिअन्स, एक थायलंड, एक आफ्रिकन आणि एक चायनीज असे इतर सहा विद्यार्थी राहतात. त्यांची लाइफस्टाइल आणि सवयी भिन्न असल्यानं आजवर मी कधी न ऐकलेले पदार्थ मला चाखायला मिळाले. या मित्रपरिवरामुळे इतर धर्म, संस्कृतीबद्दल समजलं, आदर करायला शिकले.

दोन वर्षं उलटली तरी घरातून बाहेर पडताना कुठले कपडे घालायचा याचा माझा अंदाज चुकतो. कारण नायगारा फॉल्स जवळ असल्यानं अनिश्चित या एका शब्दातच इथल्या वातावरणाचं वर्णन करता येईल. इथं कायम ऊन किंवा बर्फ असं वातावरण असतं. त्यामुळे सध्या तरी मी सगळ्यात जास्त मिस करतेय तो म्हणजे मुंबईचा पाऊस.

-निवेदिता कुलकर्णी, मुंबई ते कॅनडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज