अ‍ॅपशहर

लग्न, मुली व मुलींच्या आया

मुली आणि त्यांच्या आया बदलल्या आहेत; मात्र त्याचवेळी मुलगे आणि त्यांच्या आया अजून पारंपरिक पठडीतच वधुसंशोधन करत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 18 Jan 2020, 12:49 pm
अलका गांधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marriage


मुली आणि त्यांच्या आया बदलल्या आहेत; मात्र त्याचवेळी मुलगे आणि त्यांच्या आया अजून पारंपरिक पठडीतच वधुसंशोधन करत आहेत. त्यांना अजूनही घरचे सगळे करून, तडजोडी करत, अभावात आनंद मानणारी, नाती जोडत स्वतःचे मन मारणारी, आपल्या घरी असेल त्या परिस्थितीत सामावून जाणारी, करिअर, छंद सगळे सोयीप्रमाणे करणारी व सोयीप्रमाणे दूर सारणारी मुलगी हवी, असे अनेकदा दिसते. तशी मुलगी आता सहजासहजी सापडणे कठीण.

आजकाल मुलांची लग्न जुळणे फार कठीण झाले आहे, असे चित्र दिसते आहे अवतीभोवती. मी मुलग्यांबद्दल बोलते आहे, मुलींविषयी नाही आणि मी अॅरेंज मॅरेजविषयी बोलते आहे. आपल्याकडे सगळेच अजून प्रेमात पडून लग्न करत नाहीत. आपले आपण जुळवत नाहीत. याचे एक कारण अनेकदा घरातील पार्श्वभूमी असते. अजूनही जाती-गोत्र-कुल-नाडी यात अडकणारी मानसिकता, शिवाय लहानपणापासून भिन्नलिंगी मैत्री नसणे. घरच्या लोकांना पसंत नसल्याने मुलींपासून चार हात लांब राहण्याची प्रवृत्ती. हे अनेकांना पटलं नाही, तरी अनेक घरातली वास्तविकता आहे अजूनही. मला अजूनही आठवते, जेव्हा माझा मुलगा लहान, पहिली-दुसरीत होता, तेव्हा त्याच्या वर्गमैत्रिणी खेळायला घरी आल्या, की आजूबाजूचे परिचित म्हणायचे, ‘वा! आत्तापासून मैत्रिणी?’ मला आश्चर्य वाटायचे. आतापासून म्हणजे काय? मित्र-मैत्रिणी शाळेतूनच होणार ना लहानपणी? पण त्यांच्या त्या विचारण्यात अप्रत्यक्षपणे लिंगभाव अधोरेखित होत असे. माझ्या मुलाला तेव्हापासूनच मित्र-मैत्रिणींत भेद वाटला नाही कधी. विचारणाऱ्यांच्या मुलांना ना तेव्हा मैत्रिणी होत्या, ना आत्ता दिसतात. निदान घरी घेऊन यायला परवानगी नसेल. बाहेर असतीलही.

अशा प्रकारे मुलांची लग्न न जमणाऱ्या आई-बाबांच्या तक्रारी मी ऐकत असते. तेव्हा त्यांचे म्हणणे असते, की मुलींकडच्या अपेक्षा हल्ली खूप असतात. घर मोठे हवे, स्वतंत्र बेडरूम हवी, एकत्र कुटुंब नको, नवऱ्याला इतकाच पगार हवा, तमकीच नोकरी हवी, अमुकच भागातच राहणारा असावा. हे सगळे नवीन आहे ना? म्हणजे मुलींकडच्यांनी अटी घालणे वगैरे.. आजपर्यंत कथाकादंबऱ्या आणि चित्रपटांमधूनही मुलीच्या बाबाला लाचार होऊन दारोदार चपला झिजवतानाच वाचले-पाहिले आहे. प्रत्यक्षातही तसे अनुभव असतात. ही उलटी गंगा गेल्या दहा-पंधरा वर्षांत वाहू लागली आहे. त्यामुळे सध्या मुलींच्या आई-बाबांना, त्यातही विशेषतः मुलींच्या आयांना खूप नावे ठेवली जात आहेत. हल्लीच्या आयाच मुलींना कशा शेफारून ठेवतात, मुलींच्या वतीने त्याच कशा अटी घालतात, मुलींना नुसते डॉक्टर-इंजिनीअर बनवतात; पण साधी भाकरी भाजायलाही शिकवत नाहीत. नाती सांभाळायला शिकवत नाहीत. अॅडजस्टमेंट करायला शिकवत नाहीत... वगैरे वगैरे. तेव्हा खूप मजा वाटते. आतापर्यंत हे उलटे होते. मुलग्यांच्या आणि मुलग्यांकडच्यांच्या सतरा अटी असायच्या. जास्तीत जास्त मुली बघितल्या आणि नाकारल्या, तो आकडा त्यांच्या गौरवाचा, कौतुकाचा असायचा. शंभर मुलींचे फोटो मागवायचे, पत्रिका मागवायच्या, न्याहाळून बघायच्या, हिचे नाकच लहान आहे, तिचे केसच लहान आहेत, ही थोडी गव्हाळच आहे, ती थोडी उंचच आहे, हिला भाऊच नाही (मग सासू-सासऱ्यांचे करावे लागेल ना!) अशा क्षुल्लक खोड्या काढायच्या. पत्रिका जास्तीत जास्त जुळवत बसायचे. त्यातही खोड्या काढायच्या. मुलीच्या वडिलांना सतरा खेटे मारायला लावायचे. अजिजी करायला लावायचे. त्यातूनही पसंत केलीच एखादी, तर मानपान, हुंडा, बैठकी, बोलणी यांत मुलीच्या बापाला जीव नकोसा करायचे, हे सगळे सुशेगाद चालू होते; तोपर्यंत सगळी व्यवस्था सोयीची वाटत होती.

मग आता मुली अचानक शेफारल्या आहेत, असे का वाटू लागले? त्यांच्या आया नकचढ्या का वाटू लागल्या? गंमत आहे सगळी!
या मुलींच्या आया माझ्या पिढीतल्या. या पिढीतल्या मध्यमवर्गीय स्त्रियांची दोन पिढ्यांमध्ये ओढाताण झाली. शिक्षण तर खूप घेतले, नोकऱ्याही केल्या; पण सासरकडच्यांच्या अधीन राहून. त्यांची उस्तवार करून, दोरीवरची कसरत करून घर व नोकरी सांभाळली, आर्थिक खस्ता खाल्ल्या, तरीही मनासारखे स्वातंत्र्य मिळाले नाही. मनासारखे जगता आले नाही. सतत हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, सासू रागवेल, नणंद चिडेल, जाऊ नावे ठेवेल, शेजारीण गॉसिप करेल, या भीतीतच राहिली ही पिढी. जाणीवजागृती झाली होती; पण हिंमत नव्हती. अगदी आवडीचे कपडे घालायचीही मुभा नव्हती या पिढीला वीसेक वर्षांपूर्वी. या आया आपल्या मुलींसाठी मात्र आता सावध आहेत. आपण जे भोगले ते आपल्या मुलींना नको. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे, सतत तडजोडी न करता मनासारखे आयुष्य जगायला मिळावे, करिअर करायला मिळावे, छंद जपता यावेत, आपली मते जपता यावीत, यासाठी त्या स्त्रिया प्रत्यक्ष त्यांच्या मुलींपेक्षाही अधिक जागृत झाल्या आहेत. सावध झाल्या आहेत, त्यात नवल ते काय!

मुली आणि त्यांच्या आया बदलल्या आहेत; मात्र त्याचवेळी मुलगे आणि त्यांच्या आया अजून पारंपरिक पठडीतच वधुसंशोधन करत आहेत. अर्थात, मुलगी आणि मुलगा यांची आई एकावेळी एकही असू शकते. मुलग्याच्या बाबतीत ती वेगळा विचार करते आणि मुलीच्या बाबतीत वेगळा असेही असू शकते; पण त्यांना अजूनही घरचे सगळे करून, तडजोडी करत, अभावात आनंद मानणारी, नाती जोडत स्वतःचे मन मारणारी, आपल्या घरी असेल त्या परिस्थितीत सामावून जाणारी, करिअर, छंद सगळे सोयीप्रमाणे करणारी व सोयीप्रमाणे दूर सारणारी मुलगी हवी, असे अनेकदा दिसते. तशी मुलगी आता सहजासहजी सापडणे कठीण. (ती फक्त टीव्ही मालिकांतूनच सापडेल) त्यातच मुलांच्या वयाची पस्तिशी येते. त्यांना लग्नाची घाई होते, खानदानाला वारस हवा म्हणून उलघाल होते. त्याचवेळी मुली मात्र निवांत आहेत. त्यांना वय वाढल्याची चिंता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आमच्यावेळी २२व्या वर्षी लग्न झाले नाही, तर मुलगी घोडनवरी, प्रौढ कुमारिका म्हणून ओळखली जायची. आता मुलींना स्वतःलाच तिशी उलटली तरी लग्न नको वाटते. मुले जन्माला घालायची आणि त्यात गुंतायची घाई नसते. मुलींनी इतर जातींत प्रेम विवाह केलेलेही त्यांच्या आयांना चालू लागले आहे. लग्न झालीच, तर ठरलेले लग्न मोडण्याचे, घटस्फोटांचे प्रमाणही आता प्रचंड वाढत चालले आहे. त्यातही मुलींच्या आयांनाच अधिक नावे ठेवली जातात. या आया म्हणे, मुलींच्या संसारात लुडबूड करतात. हे ऐकल्यावर हसायला येते. शेकडो वर्षे तमाम मुलग्यांच्या आयांनी आपल्या मुला-सुनांच्या संसारात लग्नाच्या पहिल्या दिवसापासून लुडबूड केली. तिने कसे वागायचे, नवऱ्याबरोबर फिरायला जायचे की नाही, सगळ्यांसमोर त्याच्याशी बोलत बसायचे की नाही, हे सगळे मुलींच्या सासवा ठरवत गेल्या. मुली जाच सहन करत राहिल्या. मुली जळून मेल्या, पिचून मेल्या, मन मारत मेल्या, तोपर्यंत विवाह व्यवस्थेतील या उणीवा कोणाला दिसल्या नाहीत. मुलग्यांच्या आयांचीच नव्हे, तर पार आते-मावस सासवांचीही संसारात लुडबूड चालायची. ती खटकली नाही कुणाला कधी. माहेरचेही मुलींनाच सल्ला द्यायचे, सगळ्यांचे ऐकून घ्यायचे म्हणून, कुणाला उत्तरे करायची नाहीत म्हणून. गंमत आहे सगळी. लग्न झाल्या दिवसापासून मुलीने स्वयंपाक करावा, आजपर्यंत माहेरी असलेल्या सवयी, पद्धती एका रात्रीत सोडून सासरच्या पद्धती अंगीकाराव्यात, पहिल्या दिवसापासून घरातील धुणीभांडी, केरवारे इत्यादीत लक्ष घालावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता; तेव्हा मात्र कुणाला त्यात गैर वाटत नव्हते. सून आणली जात होती की मोलकरीण, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती होती, तेव्हा कुणाला ते आक्षेपार्ह वाटत नव्हते.

आता मुलींच्या आयांनाही एखाददुसरेच मूल असते. त्यात एक मुलगी त्यांना जड नसते परत आली तरी. तेही सधन असतात, मुलीही कमावत्या असतात आणि जगाला घाबरण्याची सवय आता त्यांनी सोडून दिली आहे. काही लोकांना भलतीच काळजी असते. हे लोक ना मुलग्याचे आई-बाप असतात, ना मुलीचे. त्यांना काळजी वाटते विवाहसंस्थेची, कुटुंबसंस्थेची. ती कशी टिकणार, लहान मुलांचे काय होणार, असे प्रश्न ते विचारत राहतात आणि शेवटी मुलींनाच त्यासाठी दोष देत राहतात. खरे तर गाडी रुळ बदलते, तेव्हा खडखडाट होतोच. व्यवस्थाही कात टाकत आहेत. खडखडाट तर होणारच. त्यात बदलाची तयारी ठेवली नाही, तर अधिक त्रास होणार आणि कोणतीही व्यवस्था शंभर टक्के सुयोग्य नसते. त्याचे दुष्परिणाम याला ना त्याला भोगावे लागणारच. म्हणूनच मागची शेकडो वर्षे त्या सासवांची आणि आताची वर्षे या सासवांची. ‘अभी तो दौर शुरू हुआ है भैय्या, आगे आगे देखो होता है क्या...’
(मला मुलगाच आहे बरे. मुलगी नाही, तरीही हे मी लिहिले आहे. छातीवर दगड ठेवून.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज