अ‍ॅपशहर

तुमचं-आमचं सेम नसतं!

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने हटके अन् ट्विस्ट असलेल्या प्रेम कहाण्या आमच्यासोबत शेअर करण्याचं आवाहन 'मुंटा'ने केलं होतं. अनेक उत्तम किस्से आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. एखाद्या व्यक्तीवर मनापासून केलेलं प्रेम, त्यासाठी केलेली तडजोड, घेतलेली मेहनत हे सगळं असणारी ही दोन निवडक पत्र आम्ही शेअर करत आहोत.

Maharashtra Times 14 Feb 2017, 12:42 am
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने हटके अन् ट्विस्ट असलेल्या प्रेम कहाण्या आमच्यासोबत शेअर करण्याचं आवाहन 'मुंटा'ने केलं होतं. अनेक उत्तम किस्से आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. एखाद्या व्यक्तीवर मनापासून केलेलं प्रेम, त्यासाठी केलेली तडजोड, घेतलेली मेहनत हे सगळं असणारी ही दोन निवडक पत्र आम्ही शेअर करत आहोत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम valentines day special
तुमचं-आमचं सेम नसतं!


अबोल प्रित ही!

ती सुख सुंदर होती. पाहणाऱ्यालाही लाजवेल असं तिचं सौंदर्य होतं. आमची पहिली ओळख झाली ती एका गावाच्या यात्रेमध्ये. नजरेला नजर भिडली अन् झालं, आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. नंतर थोडे बोललो. एकमेकांच्या घराचा पत्ता विचारून घेतला. आमची ओळख झाली. त्यातूनच आम्ही खूप जवळ आलो.

तिचं नाव सोनल होतं. देवाने तिला खूप सुंदर अन् माझ्यावर प्रेम करण्यासाठीच बनवलेल होतं जणू. आम्ही एकमेकांना पत्र पाठवू लागलो. घरातील सर्व झोपल्यानंतर हळूच आम्ही एकमेकांची पत्रे वाचत असू. हळूहळू एकमेकांत प्रेम वाढत गेलं. तिचं अन् माझ्या घराचं अंतर खूप असल्यामुळे आम्ही जास्त भेटत नव्हतो. रोज पत्र लिहून पाठवत असे. पोस्टमन सोबत आमची चांगली मैत्री झाली होती. भेटण्याचं ठिकाण दोघांनाही जवळ असेल असंच ठरवायचो. आम्ही भेटण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात, वृक्षवल्लीच्या सोबत दिवस घालवतं असू. माझी अन् तिची आवड-निवड एकच झाली. लैला- मजनूसारखं आमचं एकमेकांवर प्रेम होतं

आम्ही रोज भेटू लागलो. एक दिवस जर भेट नाही झाली तर काही तरी हरवल्यासारखं वाटत असे. तिला भेटल्यानंतर मी माझं सर्व दुःख विसरून जाऊ लागलो. तिने मला एक मंत्र दिला 'नेहमी हसतमुख आणि आनंदी राहायचं'. तरच जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि त्याला प्रेमाची झालर असावी. तेव्हापासून 'मी' आणि 'ती' सगळं दुःख बाजूला सारून आनंदी आणि हसतमुख राहतो. जीवन खूप सुंदर आहे तेव्हा मला समजलं. तेव्हापासून रोज हसत-हसत जगत असे. आम्ही दोघंही एकमेकांवर इतकं प्रेम करत होती की, शब्दसुद्धा कमी पडतील. म्हणतात ना, आयुष्यात प्रेम करणारं कुणीतरी असावं म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजतो. तेव्हा मला प्रेमाचा अर्थ, प्रेम काय असतं ते समजलं. म्हणूनच मला असं वाटतं की, ' प्रेम करावं माझ्यासारखं '.

- अमोल फटांगरे

प्रामाणिक संसार

माझं लग्न झालं तेव्हा मी १९ वर्षांची होते. लग्नानंतर पूजेचं आमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही दोघं प्रथमतः एकत्र गावाबाहेर पडलो. परतताना हे म्हणाले, 'आपलं लग्न आपल्या आई-वडिलांनी ठरवलं असलं तरी येथून पुढं सारं काही आपल्यालाच पाहावं लागणार आहे'. नंतरच्या वाक्यानं तर जणू त्यांनी माझ्यावर बॉम्बच टाकला. ते म्हणाले, 'मला नोकरी नाही. पण मी तुला कधीही उपाशी ठेवणार नाही'. खरंतर, मला हे चांगल्या ठिकाणी काम करतात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं होतं. आता काय करायचं? लग्न तर झालं होतं. मला काय करावं तेच क्षणभर कळेना. मात्र त्यांचा 'प्रामाणिकपणा' मला आवडला. मग मीसुद्धा निश्चय केला आता मागं हटायचं नाही. नेटानं संसार करायचा. कष्ट करून चार पैसे कमवायचे. आपल्याला नेमकं काय करता येईल असा विचार करत असताना 'पोळी-भाजी केंद्र' चालू केलं तर?...असा विचार मनात आला. आमचं घर रस्त्याला लागूनच होतं. दोन दिवसात थोडा बाजारहाट करून पोळी- भाजी विक्रीचा व्यवसाय आम्ही सुरू केला. आमच्या नशिबानं थोड्याच वेळात ग्राहकही यायला सुरुवात झाली. आज जवळजवळ १५ वर्षांनी मी विचार करते की, आपल्याला हे इतक्या सहज कसं काय शक्य झालं असावं? तर त्याचं उत्तर 'प्रेम' असंच मला मिळतं! त्यांच्या 'प्रामाणिकपणा'वर मी तेव्हा एक प्रकारे भाळली असावी आणि त्यामुळेच त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं असावं. माझ्यासारखंच प्रेम ज्यांनी ज्यांनी म्हणून केलं असेल त्यांच्याही आयुष्याचा प्रवास निश्चितच सुखा-समाधानाचा झाला असेल.

- अनुराधा पोखरकर, ठाणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज