अ‍ॅपशहर

टमी होईल कमी

आपल्याला हवी ती फॅशन करता आली नाही, की प्रत्येक स्त्री मनातून प्रचंड नाराज होते. सध्या फक्त गरोदरपणामुळेच नाही, तर बैठ्या कामामुळे तरुणींमध्येही पोटाचा घेर वाढण्याचं प्रमाण मोठं आहे. ही आरोग्याच्या दृष्टीनंही घातक गोष्ट आहे.

Maharashtra Times 11 Jun 2016, 3:00 am
स्त्रियांच्या बाबतीत पोटाचा वाढलेला घेर ही फार गंभीर आणि चिंताजनक बाब असते. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि फॅशनसाठीसुद्धा. आपल्या आवडत्या रंग, पॅटर्न आणि फॅब्रिकचा वन पीस किंवा टॉप समोर दिसत असूनही केवळ तो पोटाच्या वाढलेल्या आकारामुळे घालता न येणं, ही स्त्रियांसाठी फार दुःखदायक गोष्ट असते. हल्ली फक्त गरोदरपणामुळेच नाही, तर कॉलेज संपून नोकरी लागल्यानंतरच्या काही काळातच तरुणींच्या पोटाचा घेर चटकन वाढलेला दिसतो. यामागे बैठं काम हे प्रमुख कारण आहे. कॉलेज संपताक्षणीच नोकरी लागली, की कंपन्यांमधून बैठं काम सुरू होतं. कंपनी ते घर हा प्रवासही गाडीवर किंवा कंपन्यांच्या बसमध्ये बसूनच होतो. बौद्धिक ताण आणि त्यातून आलेल्या थकव्यामुळे अजिबात व्यायाम केला जात नाही. कामाच्या व्यापातून जेवणाच्या वेळा बदलतात. घाईघाईनं आवरण्यात झोपही पुरेशी घेतली जात नाही. या सगळ्यातून पोटाची चरबी वाढते. आहारतज्ज्ञ अंजली प्रभुणे याविषयी म्हणाल्या, ‘स्त्रियांमध्ये मुळातच कमरेच्या खालील भागात चरबी साठण्याचं प्रमाण मोठं असतं. त्यातच अजिबात हालचाल न होणं, व्यायाम सुरू नसणं, चीज, साय, आइस्क्रीम, तळलेले पदार्थ, नुडल्स, ब्रेड- बटर, सँडविचसारखे मैद्याचे पदार्थ आणि सर्व मसालेदार पदार्थ खाणं यामुळे पोटाच्या भागात चरबी साठते. अति ताणामुळे कधी जास्त खाल्लं जातं, तर कधी अजिबातच खाल्लं जात नाही. दिवसा शरीर टवटवीत असताना रात्री काम करून दिवसा झोपणं यामुळेही चरबी वाढत जाते. त्यासाठी वेळच्या वेळी जेवणं आणि दिवसा काम आणि रात्री पुरेशी झोप हे अत्यंत आवश्यक आहे.’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tummy women stress jogging run climbing hills
टमी होईल कमी


काय काळजी घ्याल? - नैसर्गिक अन्नघटकांचा आहारात समावेश असावा. - स्राव संतुलित राहतील असेच अन्नपदार्थ खावेत. - ताणमुक्त होण्यासाठी किमान एक तरी छंद जोपासावा. - पदार्थ ताजेच खावेत. - सकाळची न्याहारी पोटभर घ्यावी आणि मगच कामासाठी घर सोडावं. - रात्रीचं जेवण पोटभरून घेऊ नये. - दिवसभरात ऋतुमानानुसार एक तरी फळ खावं. - साठवणीचे पदार्थ वापरून तयार केलेले (पॅक्ड फूड) पदार्थ खाऊ नयेत. - पोटाची चरबी कमी करण्यासाठी खास पोटाचे व्यायामही सुरू ठेवावेत.



प्रसूतीनंतर पोटाचे स्नायू सैल पडतात. त्यामुळे फक्त पोटाचाच नाही, तर संपूर्ण शरीरासाठीच व्यायाम करावा लागतो. मात्र, तरुणींची बैठ्या कामामुळे वाढणारी पोटाची चरबी अधिक चिंताजनक आहे. त्याचा परिणाम मासिक पाळीवरही होतो. धावणं, सायकलिंग, वेगाने चालणं, जॉगिंग किंवा टेकडी चढणं आणि क्रंचेस यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. - वर्षा वझे, तळवलकर्स फिटनेस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज