अ‍ॅपशहर

आलाय इकोफ्रेंडली मांजा

धोकादायक ठरणाऱ्या सुरती, चिनी, नायलॉनच्या मांज्यावर बंदी आली असली, तरी पतंगप्रेमींसाठी आता वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे. पतंग उडवण्यासाठी इकोफ्रेंडली मांजा उपलब्ध झाला असून, यंदाच्या संक्रांतीला या मांजावरच ‘काय पो छे’चा खेळ आकाशात रंगताना दिसेल…

Maharashtra Times 13 Jan 2017, 3:34 am
अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ecofriendly manja fopr kites
आलाय इकोफ्रेंडली मांजा


पतंग उडवण्यासाठी इकोफ्रेंडली मांजा उपलब्ध झाला असून, यंदाच्या संक्रांतीला या मांजावरच ‘काय पो छे’चा खेळ आकाशात रंगताना दिसेल…

मकरसंक्रांत जवळ आल्याने पतंगबाजीला जोरात सुरुवात झाली आहे. मांजामुळे काहींच्या जीवावर बेतल्याच्या किंवा पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळेच या धोकादायक मांजावर बंदी आणण्यात आली आहे. पण पतंगप्रेमींसाठींसाठी खूशखबर म्हणजे कुणालाही इजा होणार नाही अशा प्रकारचा इकोफ्रेंडली-नॅचरल मांजा आता उपलब्ध झाला आहे. या मांजामुळे कुणालाही दुखापत होणार नसल्याने पतंगप्रेमी याबाबत समाधान व्यक्त करत आहेत.

पतंगबाजीची हौस भागवताना आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येतो हे अनेकांच्या गावीही नसतं. नायलॉनच्या आणि चिनी मांजाबरोबरच काचेची पूड वापरून धारदार बनवलेल्या सूरती मांजाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या मांजावर बंदी असली, तरीही पतंगांच्या मार्केट्समध्ये त्याची गुपचूप खरेदी-विक्री सुरू असते. म्हणूनच हा इकोफ्रेंडली मांजा मार्केटमध्ये आला असून, त्याला पतंगप्रेमी पसंती देत आहेत.
मुंबईतल्या अजमेर मैदानामध्ये अलीकडेच झालेल्या ‘आय-काइट’ फेस्टिव्हलमध्ये याच इकोफ्रेंडली मांजाचा वापर करून अनेक पतंगप्रेमींनी पतंग उडवले. या काइट फेस्टिव्हलमध्ये पतंगप्रेमींची गर्दी केली होती.

कॉटनपासून बनवलेला हा इकोफ्रेंडली मांजा पर्यावरणपूरक आहे. काचेची पूड किंवा कोणत्याही वेगळ्या गोष्टीचा वापर यात करण्यात आला नसल्याने पक्षी किंवा कुणालाही यामुळे दुखापत होत नाही. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला हा मांजा वापरुनच पतंग उडवण्यावर भर दिला जाणार आहे. नायलॉनच्या मांजाप्रमाणे एकमेकांची पतंग कापून खेळाची रंगत कदाचित वाढणार नाही. परंतु नियमांचं पालन करण्यासोबतच इकोफ्रेंडली पतंगबाजी करण्यात मजा असल्याचं यावेळी उपस्थित असलेल्या पतंगप्रेमींनी आणि आयोजकांनी सांगितलं.

एलईडी पतंगांची लखलख
नेहमीच्या साध्या कागदी किंवा कपड्याच्या पतंगावर मस्त लाइट्सची सजावट केली आणि असे पतंग अंधारात उडवले तर, मजा येईल ना? हेच चित्र आय-काइट फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळालं. गरुड, मत्स्य आणि कनेक्शन अशा हट के पतंगांबरोबरच एलईडी पतंग पतंगप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले. खास करून रात्रीच्या वेळी असे पतंग उडवून पतंगबाजीचा आनंद घेता यावा म्हणून यात पतंगांमध्ये एलईडी लाइट्सचा वापर केलेला असतो. आकाशात रंगीबेरंगी ताऱ्यांप्रमाणे भासणारे या पतंगांना खूप पसंती मिळाली. त्याबरोबरच एलईडीचे फुगेही बच्चेकंपनीला आवडल्याचं दिसून येत होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज