अ‍ॅपशहर

९३४ विद्यार्थ्यांची ‘टीईटी’ला दांडी

म टा प्रतिनिधी, नगरमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी आयोजित केलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नगर शहरामध्ये शांततेत पार पडली आहे...

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, नगर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी आयोजित केलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नगर शहरामध्ये शांततेत पार पडली आहे. या परीक्षेला सकाळच्या सत्रामध्ये झालेल्या पेपरला ३ हजार ९१९ तर दुपारच्या सत्रामध्ये झालेल्या पेपरला ३ हजार ८२० विद्यार्थी उपस्थित होते. या दोन्ही पेपरला मिळून ९३४ विद्यार्थी गैरहजर होते.

शिक्षक होण्यासाठी डीएड, बीएड धारकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. टीईटी परीक्षेचे ८ जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र, यादिवशी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) असल्यामुळे टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नवीन वेळापत्रकानुसार रविवार (१५ जुलै) रोजी ही परीक्षा झाली आहे.

नगर शहरामध्ये टीईटी परीक्षेतील सकाळच्या सत्रात झालेल्या पेपर क्रमांक एक १३ केंद्रावर घेण्यात आला. या पेपरसाठी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू अशा चार माध्यमातील जवळपास ४ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ५०८ विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. तर, टीईटी परीक्षेचा पेपर क्रमांक दोन हा नगर शहरातील नऊ केंद्रावर झाला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड अशा पाच माध्यमातील जवळपास ४ हजार २४६ विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ८२० विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक दोन दिला असून ४२६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. नगर शहरातील सर्व केंद्रावर ही परीक्षा शांततेत पार पडली असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज