अ‍ॅपशहर

'मी हतबल होऊन जीवन संपवत आहे...'; पोलीस कर्मचाऱ्याच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Ahmednagar Police News : आघावा राजूर पोलीस ठाण्यात असताना जून २०२१ मध्ये सदर कर्मचाऱ्याविरुद्ध एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Authored byविजयसिंह होलम | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2022, 7:18 pm
अहमदनगर : अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यात नियुक्ती असताना सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा हवालदार भाऊसाहेब दगडु आघाव (वय ५२ रा. बारागांव नांदुर) यांच्याविरूद्ध मागील वर्षी दाखल झाला होता. त्यांनी आज मुळा धरणावर बंदोबस्तावर असताना गोळी झाडत आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी आघाव यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून पोलीस दलातील आर्थिक देवाणघेवाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा आणि चौकशीचं प्रकरण मिटविण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी होत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. त्यानुसार एक पोलीस अधिकारी आणि दोघा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar police death
अहमदनगर पोलीस


हवालदार आघाव यांनी शनिवारी सकाळी बंदोबस्तावर असताना मुळा धरणावरील पोलीस चौकीत गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तपासणीत आघाव यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं आढळून आले. या चिठ्ठीत जुन्या घटनेचा उल्लेख आहे. आघावा राजूर पोलीस ठाण्यात असताना जून २०२१ मध्ये त्यांच्याविरूद्ध एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांची नगरच्या मुख्यालयात बदली झाली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शेतकऱ्यांची दसऱ्यातच दिवाळी जोरात; गोकुळ, वारणेसह संघ देणार २०० कोटींचा फरक बोनस

या घटनेचा संदर्भ देत आघावा यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे की, 'बंदोबस्ताच्या कामासाठी आपण अकोले येथे गेलो असता तेथे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साबळे भेटले. त्यांनी सांगितलं की, तुम्ही शेंडी येथे नियुक्तीला असताना अवैध धंदे बंद केल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर मी हवालदार निमसे यांना हाताशी धरून तुमच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून माझे पैसे सुरू झाले. या गुन्ह्यातून आणि चौकशीतून सुटायचे असेल तर १० लाख रुपये द्या. यात माझा, निमसे तसेच फिर्याद देणारी महिला कर्मचारी आणि चौकशीचे काम पहणारे फुंदे भाऊसाहेब यांचा वाटा आहे, असे साबळे यांनी सांगितले. मात्र, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगून आपण ते टाळले. काही दिवसांनी चौकशी करणाऱ्या फुंदे यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की यातून सुटायचे असेल तर साबळे सांगतात तसे करा अन्यथा परिणाम भोगा. त्यानंतर मला पोलीस अधीक्षकांकडे चौकशी कक्षासाठी बोलावण्यात आले. त्यावेळी आपण पोलीस अधीक्षकांना सर्व हकिगत सांगितली. त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मी पूर्णपणे हतबल झालो असून स्वत:ला संपवत आहे,' असं आघाव यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे.

ठाकरेंना ९६ मध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं, बाळासाहेबांशी खोटं बोलायला लावलं : सुरेश नवले

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक संदीप मिटके, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चिठ्ठी हस्तगत करण्यात आली असून त्यानुसार तिघांविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख