अ‍ॅपशहर

पंतप्रधान मोदींच्या फ्लेक्समुळे महापालिकेसमोर पेच, कारवाई सुरू करताच…

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये भाजपच्या खासदारानं लसीकरण केंद्राबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह लावलेल्या फ्लेक्समुळं महापालिकेपुढं वेगळाच पेच निर्माण झाला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2021, 2:39 pm
अहमदनगर: मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणे, लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र असणे यासंबंधी वेगवेगळे मतप्रवाह आणि वादप्रतिवाद सुरू आहेत. अशातच अहमदनगरमध्ये भाजप खासदाराने लावलेल्या फ्लेक्सवरून महापालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या ‘धन्यवाद मोदीजी’ फलकांबद्दल तक्रार आल्याने मनपाने कारवाई सुरू केली खरी, मात्र वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप झाल्यावर ती थांबविण्यात आली. नियमानुसार फ्लेक्सला परवानगी कशी देता येईल, याचाही पेच निर्माण झाला आहे. (PM Modi's Flex Outside Covid Vaccination Centre in Ahmednagar)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar
अहमदनगर


वाचा: मनसेमध्ये बदलाच्या मोठ्या हालचाली; अमित ठाकरे नाशिकमध्ये

नगर शहरात महापालिका रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय येथे करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र लस उपलब्ध झाल्यापासूनच सुरू आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी तेथे भाजपचे खासदार सुजय विखे यांच्याकडून आभार व्यक्त करणारे फ्लेक्स लावण्यात आले. सर्वांना मोफत लस दिल्याबद्दल मोदींचे आभार मानणारा मजकूर त्यावर आहे. सोबत पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो, त्या खालोखाल खासदार विखे यांचा फोटा आणि वरच्या बाजूला लहान आकारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची छायाचित्रे आहेत. सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदींचे आभार असा एकूण या फ्लेक्सचा सूर आहे.
शहरातील लसीकरण केंद्राबाहेर हे फ्लेक्स पाहून काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने ते काढून टाकण्यास सुरुवात केली. तीन-चार ठिकाणचे फ्लेक्स काढले असतानाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत संपर्क करून या कारवाईला हरकत घेतली. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरूनही संपर्क झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कारवाई मोहीम थांबविण्यात आली. यासंबंधी आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले की, ‘या फलकांना मनपाची परवानगी नसल्याने ते काढण्याचे काम सुरू केले. त्यांना परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे.’

वाचा: नारायण राणे पुन्हा फॉर्मात; पहिल्याच दौऱ्याची राज्यभर चर्चा

वास्तविक शहरात फ्लेक्ससंबंधीचे नियम न्यायालयाच्या आदेशानंतर कठोर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोठेही ते लावण्यास परवानगी देणे कठीण आहे. यासाठी मनपाने व्यावसायिक वापरासाठी जे होर्डिंग्ज दिले आहेत, तेथेच अशी सशुल्क परवानगी आहे. मात्र, भाजपला हे फ्लेक्स लसीकरण केंद्रबाहेरच हवे आहेत. त्यामुळे तेथे परवानगी कशी द्यायची, असा प्रश्न तर आहेच. शिवाय उरलेले फ्लेक्स कसे काढायचे, हाही पेच महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे लशीचा पुरवठा नियमित होत नसल्याने वारंवार लसीकरण ठप्प होत असल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळ होण्याचे प्रकार सुरूच आहेत.

वाचा: थांब रे, मध्ये बोलू नको... राणेंनी दरेकरांना बोलूच दिलं नाही! व्हिडिओ व्हायरल
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज