अ‍ॅपशहर

कर्जत-जामखेडमध्ये मॅच फिक्सिंग, रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्याची संधी हुकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज जोरदार फटकेबाजी केली.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2021, 12:00 pm
अहमदनगर: कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकमेकांचे विरोधक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे दोघे एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर येता येता राहिले. पवारांना उशीर झाल्याने शिंदे आधीच निघून गेले. त्यानंतर आलेल्या पवारांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. ‘कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्वांची बॅटिंग मी पाहिली आहे. येथे फिल्डिंग करणारे आहेत आणि मॅच फिक्सिंग करणारेही आहेत,’ या त्यांच्या वाक्यावर हशा पिकला असला तरी त्यांचा रोख कोणाकडे होता, यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. (Rohit Pawar Speaks on Karjat Jamkhed Politics)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Pawar
रोहित पवार


कर्जत शहरात नव्याने सुरू झालेल्या एका कृषी विषयक मॉलचे उद्घाटन झाले. यासाठी आमदार पवार व माजी मंत्री शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. पवार व शिंदे प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने कोण काय बोलणार, यासंबंधी नागरिकांमध्ये उत्सुकता होती. प्रत्यक्षात मात्र दोघे एकत्र आलेच नाहीत. पवार येण्यापूर्वीच शिंदे भाषण करून निघून गेले. शिंदे यांनी कोणतेही राजकीय भाष्य टाळून केवळ शुभेच्छापर भाषण केले. त्यानंतर आलेल्या पवार यांनी मात्र चांगलीच फटकेबाजी केली.

वाचा: ड्युटीवर असताना मोबाइलचा वापर कसा करायचा? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियम

ते म्हणाले, ‘आजच्या कार्यक्रमात व्यवसाय, खेळ, राजकारण व धार्मिक या सर्व विषयांवर भाषणे झाली. मलाही क्रिकेट खूप आवडते आणि मी क्रिकेट खेळतो देखील. कर्जत-जामखेडमधील सर्वांच्या बॅटिंग मी पाहिल्या आहेत. येथे बॅटिंग करणारे आहेत, फिल्डिंग करणारे आहे. तसेच सर्व ठिकाणी मॅचफिक्सिंग करणारे देखील आहेत.’ त्यांच्या या विधानाला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळाली. काहींकडून त्याचा राजकीय अर्थही काढला जाऊ लागला आहे.

Live: मुख्यमंत्री आज महाडला जाणार; दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी करणार

कर्जत-जामखेड मतदारसंघात आतापर्यंत पवार-शिंदे एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत. या उद्घाटनासाठी दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे नागरिकांची उत्सुकता वाढली होती. यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. अखेर उपस्थितांची दोघांना एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी हुकली. परंतु रोहित पवार यांनी या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्या या भाषणाची आता मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज