अ‍ॅपशहर

करोना काळातही दिवाळी गोड! 'हा' कारखाना देणार २० टक्के बोनस

संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने करोनाच्या संकटात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. दिवाळीनिमित्त २० टक्के बोनस आणि सभादांना १५ किलो साखर मोफत देण्याचा निर्णय कारखान्यानं घेतला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2020, 6:02 pm
अहमदनगर: करोनामुळे लॉकडाउन झाल्याने बहुतांश उद्योग अडचणीत आल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. अशा काळात बोनस मिळणे तर दूरच. मात्र, संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस आणि सभादांना १५ किलो साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार आणि सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sugar-Factory


राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. कामगारांना २० टक्के बोनस, ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान, सभासदांना १५ किलो साखर मोफत तर शेतकऱ्यांच्या ठेवींचे सुमारे दीड कोटी रुपये परत करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे. करोनाचे संकट याशिवाय कसाबसा उरकलेला मागील गळीत हंगाम आणि यार्षीच्या गळीत हंगामापुढील संभाव्य अडचणी लक्षात घेता कारखान्याचा हा निर्णय धाडसी माला जात आहे. कारखान्यांमधील स्पर्धा लक्षात घेता आता थोरातांनी निर्णय घेतल्याने इतर कारखान्यांनाही आपापल्या कामगार आणि सभादांना काही ना काही दिलासा द्यावा लागणार आहे.

वाचा: महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे माहीत आहे का?; कोर्टाने 'त्यांना' झापले

संगमनेर कारखान्याच्या निर्णयाची माहिती देताना महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले की, ‘सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने कायम शेतकरी, कष्टकरी व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यावर्षी करोनाचे संकट व आर्थिक मंदी असतानाही कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे. आता दिवाळीनिमित्त कामगारांना २० टक्के बोनस म्हणून ५ कोटी ३८ लाख रुपये, तर ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान म्हणून २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या ठेवीचे १ कोटी ४८ लाख रुपये देण्यात येणार आहेत. कारखान्याच्या सर्व सभासदांना १५ किलो साखर मोफत देण्यात येणार आहे.’
कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजितभाऊ थोरात व सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

वाचा: पुणेकरांचे पाऊसहाल; अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज