अ‍ॅपशहर

गांधीजींचे खरे की मोदींचे?

‘महात्मा गांधी म्हणत होते खेड्याकडे चला, आपण म्हणता शहरीकरण संकट नाही, ती एक संघी आहे. त्यामुळे देशातील जनतेला प्रश्न पडला आहे की,महात्मा गांधी म्हणत ते खरे की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ते खरे?’ असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 12:27 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna hazare writes letter to modi
गांधीजींचे खरे की मोदींचे?


‘महात्मा गांधी म्हणत होते खेड्याकडे चला, आपण म्हणता शहरीकरण संकट नाही, ती एक संघी आहे. त्यामुळे देशातील जनतेला प्रश्न पडला आहे की,महात्मा गांधी म्हणत ते खरे की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ते खरे?’ असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणास विरोध दर्शवत गावांना चालना देण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्‍‍घाटनाच्यावेळी पुण्यात केलेल्या भाषणाचा संदर्भ देत हजारे यांनी हे खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘महात्मा गांधी म्हणत होते, निसर्गाचे शोषण करून केलेला विकास हा शाश्वत विकास नव्हे. त्यातून एक ना एक दिवस विनाश होणार आहे. शहरीकरणामुळे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यांचे अमर्याद शोषण होत आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. तापमान वाढत असून त्यापासून धोका निर्माण होत आहे. समुद्राची पाणीपातळी वाढून शहरांना धोका असल्याचे वैज्ञानिक सांगत आहेत. तरीही आपण शहरीकरणाला संधी म्हणत आहात, याचे आश्चर्य वाटते,’ असे हजारे यांनी म्हटले आहे.पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘यामुळेच गांधीजी विकासामध्ये गावाला केंद्र बिंदू मानून काम करावे, असे म्हणत. गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तर शहराकडे जाणाऱ्यांचा ओघ कमी होईल, शहरांवरील ताण आणि सरकारचेही काम वाचेल. जोपर्यंत गाव बदलत नाही, तोपर्यंत देश बदलणार नाही, असे महात्मा गांधी म्हणत होते. आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये जेवढा रस आहे, तेवढा लोकपाल व राज्यातील लोकायुक्त निवडीमध्ये असायला हवा होता, असे मला वाटते. आपण अनेक वेळा म्हणता सत्तेचे विक्रेंद्रीकरण होऊन जोपर्यंत लोकांच्या हतात सत्ता येत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही येणार नाही. परंतु आपण बोलता एक आणि प्रत्यक्षात ते करीत नाहीत, ही लोकांच्या मनातील भावना आहे. समाज आणि देशाच्या भवितव्यासाठी जेव्हा जेव्हा मी सत्य बोललो तेव्हा तेव्हा आपणास त्याचा राग आल्यानेच आपण माझ्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. मी हे पत्र लिहून काही चूक केली नाही. पण तसे वाटत असल्यास क्षमा करावी,’ असेही हजारे यांनी शेवटी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज