अ‍ॅपशहर

धाकधूक अन् विजयोत्सव

मतदान यंत्र उघडल्यानंतर कोणाला मते जास्त मिळतात... कोण आघाडीवर...विजयाचा आकडा जुळल्यानंतर विजयोत्सव...गुलालाची उधळण... असे वातावरण महासैनिक लॉनच्या मतमोजणी केंद्रावर होते.

Maharashtra Times 24 Feb 2017, 3:00 am
नगर : मतदान यंत्र उघडल्यानंतर कोणाला मते जास्त मिळतात... कोण आघाडीवर...विजयाचा आकडा जुळल्यानंतर विजयोत्सव...गुलालाची उधळण... असे वातावरण महासैनिक लॉनच्या मतमोजणी केंद्रावर होते. नगर तालुक्यातील मतमोजणीत नागरदेवळे, वाळकी गटाच्या निकालाची उत्सुकता शेवटचा फेरीपर्यंत ताणली गेली होती. शिवसेनेने पंचायत समितीची सत्ता एकहाती राखत व तीन गटही जिंकल्याने मतमोजणी केंद्राबाहेरील वातावरण शिवसेनामय झाले होते. तर एक गट मिळविता न आल्याने भाजप समर्थकांत मात्र शांतता होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atmosphere at counting center
धाकधूक अन् विजयोत्सव


नगर तालुक्यातील सहा गटांची व पंचायत समित्यांची गणांची मतमोजणी महासैनिक लॉन येथे गुरुवारी झाली. सकाळी दहा वाजता मतदान मोजणी कक्षात मतदान यंत्र आणल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती. देहरे गट व या गटातील दोन गणांच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. दुसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार प्रताप शेळके हे आघाडीवर गेल्यानंतर समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. या गटानंतर जेऊर गटाची मतमोजणी सुरुवात झाली. पांगरमल येथे दारूकांडाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार भाग्यश्री मोकाटे या पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहून मोठ्या मतधिक्क्याने विजयी झाल्या. तर जेऊर गणातून शिवसेनेच्या गुन्हा दाखल झालेल्या मंगला आव्हाड या ही विजयी झाल्या. परंतु, हे उमेदवार मतमोजणीसाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे समर्थक मतमोजणी करून निघून गेले.

नागरदेवळे गटाच्या मतमोजणीची मात्र उत्सुकता वाढली होती. भाजपचे राम पानमळकर आणि शिवसेनेचे शरद झोडगे यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत राम पानमळकर हे थोड्या मताने आघाडीवर होते. भाजपला दोन गटांत यश मिळाले नसल्याने या गटात तरी यश येईल, असे भाजप समर्थकांना वाटत होते. त्यांनी आमदार कर्डिलेंचा नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली होती. परंतु, शेवटच्या फेरीत सेनेचे झोडगे यांना अवघ्या १२१ मतांची आघाडी मिळून विजयी झाले. त्यामुळे काही वेळ शांतता पसरलेल्या शिवसेना समर्थकांनी पुन्हा गुलालाची उधळण करून घोषणा देण्यास सुरुवात केली. दरेवाडी गटात शिवसेनेचे संदेश कार्ले हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यानंतर विजयी उमेदवार शरद झोडगे व संदेश कार्ले यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्ते नाचत होते. निंबळक गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव लामखडे गटात विजयी झाले असेल तरी दोन्ही निंबळक गण आणि चास गण मात्र शिवसेनेच राखले होते.

वाळकी गटात भाजपच्या स्वाती बोठे पहिल्या फेरीत चारशे मतांनी आघाडीवर होत्या. तर दुसऱ्या फेरीत अनिता हराळ या आघाडीवर होत्या. शेवटच्या फेरीत कोणाच्या बाजूने निकाला लागतो याची उत्सकुता होती. शेवटची फेरीत हराळ यांना आघाडी घेऊन त्या विजयी झाल्या. या गटातील वाळकी गणात भाजपचे रवींद्र कडूस विजयी झाले. तालुक्यात शिवसेना व काँग्रेस आघाडीला निर्विवाद यश मिळाल्याने माजी आमदार अनिल राठोड यांच्या कार्यालयात उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला.

पुन्हा मतमोजणीची करण्याची मागणी

वाळकी गटातील गुंडेगाव गणात काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवाराला अवघ्या ५८ मतांनी पराभूत केले. भाजपच्या उमेदवाराकडून पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, निवडणूक अधिकारी वामन कदम यांनी हा अर्ज फेटाळून लावला. झेडपीच्या सर्व जागांवर पराभव व पंचायत समितीच्या तीन जागा आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती. शिवसेना व काँग्रेस आघाडीवर असल्याने दोन्ही पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज