अ‍ॅपशहर

बँक कर्मचारी, अधिकारी उद्या संपावर

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी (२८ फेब्रुवारी) लाक्षणिक संप करणार असल्याने या दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

Maharashtra Times 27 Feb 2017, 4:45 am
बँका बंद राहणार; नोटाबंदी कामाच्या मोबदल्याची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bank worker strike
बँक कर्मचारी, अधिकारी उद्या संपावर


म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी (२८ फेब्रुवारी) लाक्षणिक संप करणार असल्याने या दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. नोटाबंदीच्या काळात बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळण्यासह या काळात बँकांनाही कराव्या लागलेल्या अतिरिक्त खर्चाची भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी हा संप केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेने २८ फेब्रुवारीच्या संपाचे आवाहन केले आहे. नगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुमारे आठशेच्या वर शाखा व मुख्यालये या दिवशी बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे दोन हजारावर बँक कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता लालटाकीजवळील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर बँक अधिकारी व कर्मचारी निदर्शने करणार असल्याची माहिती फोरमचे समन्वयक कांतीलाल वर्मा यांनी दिली.

केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने नोटा बंदी जाहीर केल्यावर आवश्यक प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध करवून न दिल्याने आजही सर्वसामान्य जनतेला आर्थिक व्यवहार करणे त्रासदायक झाले आहे. बँकांतून पैसे काढण्याच्या रकमेवरील निर्बंध शिथिल केले असले तरी त्या प्रमाणात नव्या नोटांची उपलब्ध होत नाही. त्यामुळे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे वर्मा यांनी सांगितले. नोटा बंदीच्या काळात बँकांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जावा तसेच या काळात बँकांना कराव्या लागलेल्या तांत्रिक व अन्य सुधारणांसाठीच्या खर्चाची भरपाई दिली जावी, अशा दोन मागण्यांसाठी मंगळवारी संप केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय स्टेट बँकेत सहयोगी बँकांचे विलिनीकरण रद्द केले जावे, कामगार कायद्यातील सुधारणा रद्द कराव्यात, कंत्राटी कामगार पद्धत बंद करावी तसेच बँकांतील थकीत व बुडीत कर्जदारांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, कर्ज बुडवणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशाही विविध मागण्या या निमित्ताने फोरमद्वारे केल्या गेल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज