अ‍ॅपशहर

Corona: करोनाचा दाखला देत भाजप नेत्यांचे निवेदन हातात घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

करोनाची साथ असल्याचं कारण देत नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन हातात घेण्यास नकार दिल्यानं भाजप नेते संतापले आहेत. जिल्हाधिकारी दुजाभाव करत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.

Authored byसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2020, 10:01 pm
म.टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम करोना व्हायरस


भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन हातामध्ये घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र या पदाधिकारी समोरच त्यांनी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. आज घडलेल्या या प्रकारामुळे मात्र नवीन वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांनी तर थेट जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत असल्याचा आरोप करत त्यांची तक्रार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

वाचा: पार्थ पवारांच्या मनात काय? नव्या भूमिकेमुळं तर्कवितर्कांना उधाण

आज जिल्हाधिकारी कार्यालयात नगर शहरातील व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याची वेळ दोन तास वाढवून देण्यात यावी, अशा मागणीसाठी भाजप व्यापारी आघाडीकडून निवेदन देण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे हे व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह आले होते. मात्र हे निवेदन कोविड मुळे प्रत्यक्ष हातामध्ये स्वीकारण्यास जिल्हाधिकारी यांनी नकार दिल्याचा दावा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे. तर, दुसरीकडे मात्र शिवसेनेचे एक निवेदन भाजपच्या पदाधिकाऱ्यां समोरच खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले. त्यामुळे मात्र भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांचा चांगला संताप झाला. जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाचा: ठाकरेंचा विश्वासू शिलेदार नाराज; मनधरणीसाठी झाली बैठक

ते म्हणाले, 'नगर शहरातील व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याची वेळ दोन तास वाढवून देण्यात यावी, या संदर्भात आमच्या व्यापारी आघाडीचे पदाधिकाऱ्यांचे आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास आलो होतो. पण जिल्हाधिकारी यांनी कोविड असल्यामुळे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. पण माझ्या देखतच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे खासदार लोखंडे यांनी दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले. त्यामुळे अशा दुजाभाव पद्धतीने वागणाऱ्या अधिकार्‍यांचा भाजपतर्फे आम्ही धिक्कार करीत आहोत. तसेच यासंदर्भातील सविस्तर माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कळवणार आहे व त्यांच्याकडे या प्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी करणार आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज