अ‍ॅपशहर

कर्करोग जनजागृतीसाठी धाव

कर्करोग जनजागृतीसाठी आयोजित मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये अडीच हजारावर नागरीकांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

Maharashtra Times 20 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cancer awareness run
कर्करोग जनजागृतीसाठी धाव

कर्करोग जनजागृतीसाठी आयोजित मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये अडीच हजारावर नागरीकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. अबालवृद्धांनी एकमेकांच्या साथीने लक्ष्य गाठण्यात यश मिळवले. अविनाश साबळे या खेळाडूने २१ किलोमीटरचे अंतर १ तास ११ मिनिटे ५८ सेकंदात पूर्ण करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
(स्व.) शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने कर्करोगाविषयी जनजागृतीसह नागरिकांमध्ये व्यायामाची आवड रुजवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या तिसऱ्या वर्षी ३, ५, १० व २१ किलोमीटर गटात भुईकोट किल्ला ते चांदबीबी महाल या मार्गावर ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना रोख बक्षीस, मेडल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तर स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. एसी सेंटर अँड स्कुलचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुंबईचे वरिष्ठ पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश तसेच लेफ्टनंट कर्नल जगजितसिंग तन्वर (एसी रेकॉर्डस), धर्मादाय उपायुक्त हिरा शेळके, आमदार संग्राम जगताप तसेच आशा फिरोदिया, अभिषेक कळमकर, कर्नल गगनसिंग, योगेश मालपाणी, डॉ. धनंजय वाघ, सचिनकुमार, हरमज पंडोल, निलेश मालपाणी, वैभव घाटगे आदींसह अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

पहाटेपासून गर्दी

भिंगारजवळील भुईकोट किल्ल्यामागे असलेल्या नगर क्लबच्या परिसरात पहाटेपासून अबालवृद्धांची गर्दी केली होती. पहाटे साडेपाचला २१ किलोमीटरची मॅरेथॉन सुरू झाली. लकडी पुलापासून वडारवाडीमार्गे चांदबिबी महालाच्या दिशेने या मॅरेथॉनचा मार्ग होता. स्पर्धेच्या नगर-पाथर्डी मार्गावर नागरिकांची गर्दी झाली होती. या खेळाडूंना दिशादर्शन करणारे दुचाकीस्वार, कोणाला पाणी वा अन्य काही गरज भासली तर त्याची तत्परतेने पूर्तता करणारी टीम समवेत होती. येथील युवान संस्थेच्या युवकांनी ही जबाबदारी उत्साहाने पार पाडली.

स्फूर्तीदायक गीते

मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी नगर क्लबच्या लॉनवर सुमित गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे वार्मअप शिबिर झाले. त्यानंतर ‘यहा के हम सिकंदर’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘चक दे इंडिया’ अशा जोष निर्माण करणाऱ्या गाण्यांच्या पार्श्वभूमीवर आधी २१ किलोमीटरची व नंतर १० किलोमीटरची मॅरेथॉन सुरू झाली. या दोन्ही स्पर्धांमध्ये बहुतांश व्यावसायिक खेळाडूंसह नियमित धावण्याचा सराव करणाऱ्या नगरकरांनी भाग घेतला.
मुख्य मॅरेथॉन मार्गी लागल्यावर हौशी मंडळींसाठी ३ व ५ किलोमीटरची स्पर्धा झाली. यात नगरमधील हौशी धावपटूंनी तसेच नियमित व्यायाम करणारांनी भाग घेतला. शालेय विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, महिला मंडळांच्या सदस्याही यात होत्या. छोटी बालकेही आपल्या आई-वडिलांसमवेत रस्त्याने धावताना दिसत होती. अपंग, शारीरिक विकलांगता असलेल्यांसह कर्करोग रुग्णही यात उत्साहाने सहभागी झाले होते. युवक-युवती, महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंसमवेत सेल्फी घेण्याचीही लगबग अन्य खेळाडूंमध्ये होती. स्पर्धेत सहभागी विविध ग्रुप्सही सेल्फीमय झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज