अ‍ॅपशहर

विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी सत्ता आमचीच: मुख्यमंत्री

'दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, 'पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 2:27 pm
पाथर्डी: 'दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, 'पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra-mahajanadesh


महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसला धारेवर धरले. 'कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही काँग्रेसच्या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे,' असा दावा त्यांनी केला.

'ईव्हीएम २००४ साली देशात आले व २०१४ पर्यंत राज्यात व देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हते. मग भाजप जिंकायला लागला की ईव्हीएम खराब कसे काय झाले, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. सुप्रिया सुळे जिंकल्या तेव्हा ईव्हीएम खराब नाही. मात्र डॉ. सुजय विखे जिंकले तर हे ईव्हीएम खराब झाले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ईव्हीएम विरोधकांवर केली. 'पुढची २५ वर्षात आमची सत्ता हटणार नाही. दोन्हीही काँग्रेसने आता आपण केलेल्या चुकांबद्दल जनतेची माफी मागण्याचे काम करावे. तसे केल्यास थोडीफार मते त्यांना मिळतील व एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करता येईल, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

ताजनापूर येथील योजनेसाठी राज्य सरकार दीडशे कोटी रुपये देणार असून गोदावरी प्रकल्प योजनेच्या माध्यमातून मराठवाडा व पाथर्डी तालुक्यात असलेल्या अनेक गावात पाणी देऊन या ठिकाणचा पाणीप्रश्न सोडवला जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज