अ‍ॅपशहर

भाजपचा ‘मेक इन इंडिया’ फसवाः थोरात

२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपाने केंद्रात सत्ता मिळविली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. रोजगार निर्मीती करण्याच्या नावाखाली मोठा डांगोरा पिटवून ‘मेक इन इंडिया’ ची घोषणा केली. मात्र ही संपूर्ण योजनाच फसवी निघाली आहे अशी जोरदार टीका काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Maharashtra Times 17 Jul 2018, 11:21 am
ताराचंद म्हस्के । शिर्डी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम make-in-india


२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपाने केंद्रात सत्ता मिळविली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. रोजगार निर्मीती करण्याच्या नावाखाली मोठा डांगोरा पिटवून ‘मेक इन इंडिया’ ची घोषणा केली. मात्र ही संपूर्ण योजनाच फसवी निघाली आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेसचे निष्ठावान आणि पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातील विश्वासू सहकारी अशी बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. केंद्रीय कार्यकारिणीत घेऊन काँग्रेस हायकमांडने राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी दिल्याने . बाळासाहेब थोरात यांचे पक्षातील वजन आणखी वाढले आहे. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. केंद्रातील भाजप सरकारवर टीका करतांना थोरात यांनी निवृत्त एअर व्हाईस मार्शल कपिल काक यांनी एका इंग्रजी दैनिकातून लिहिलेल्या लेखाचा दाखला दिला आहे. या लेखात कपिल काक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे वाभाडे काढतांना ‘भाजप सरकारला काहीही भरीव करायची ईच्छा नाही, या सरकारकडे धोरण नाही, क्षमता नाही आणि फक्त आकर्षक घोषणा देऊन जाहिरातबाजी करायची आहे" अशी जोरदार टीका केली आहे. याकडे थोरात यांनी लक्ष वेधले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, एअर व्हाईस मार्शल कपिल काक यांचे नाव आजही भारतीय हवाई दलात मोठ्या आदराने घेतलं जाते. १९८१ साली त्यांना विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आलेले आहे. ‘सेंटर फॉर एअर डिफेन्स स्टडी’ या संस्थेशी ते निगडीत आहेत.संरक्षण उत्पादन क्षेत्रात खाजगी उद्योजकांना प्रवेश द्यावा या भूमिकेचे ते मोठे समर्थक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मेक इन इंडिया" कार्यक्रमाची घोषणा केली आणि खाजगी क्षेत्राला यापुढे संरक्षण सामुग्री उत्पादनात मुक्त प्रवेश असेल असं पंतप्रधानांनी जाहीर केल्यावर काक यांनी पंतप्रधानाच्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले. भारतातील शस्त्रास्त्र कारखाने आता जुनाट झाले आहेत. संरक्षण खात्याकडे आधीच पैशाची चणचण असते. तिथल्या लोकांचे गलेलठ्ठ पगार देत बसायचे आणि दारुगोळा बनवण्या ऐवजी सैनिकांचे गणवेष तिथे शिवत बसायचे, हा आतबट्ट्याचा व्यवहार बंद करा ही त्यांची जुनीच मागणी होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना कपिल काक यांनी पूर्ण पाठिंबा त्यावेळी दर्शविला होता.

थोरात म्हणाले,तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांचं गुणगान करणारे एअर व्हाईस मार्शल कपिल काक (निवृत्त) अलीकडे पंतप्रधानावर इतके का संतापले आहेत ? काक यांच्या म्हणण्या प्रमाणे इतर देशांकडून शस्त्रास्त्रं विकत घेणं ही भारताला नवी गोष्ट नाही. पण ’मेक इन इंडिया’ याचा अर्थ हळूहळू ते तंत्र-ज्ञान घेऊन भारतात उत्पादन सुरू व्हायला हवं. नौदलाला लागणारी तेजस ही ‘लाईट कॉम्बॅट’ विमानं (मोदी सत्तेवर येण्याच्या आधीपासूनच) भारतात बनतात. ‘चेतक’ ही हेलिकॉप्टर्स तर पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. ती सुद्धा आधीचीच. तरीही आज दोनशे-तीनशे हेलिकॉप्टर्स बाहेरून खरेदी करण्याची मागणी नोंदवली जात असेल तर मग ‘मेक इन इंडियाचा’ अर्थ काय ? वास्तविक, युद्धनौका, पाणबुड्या, विमानवेधी तोफा यांच्या उत्पादनात, तंत्र-ज्ञान विकसित करण्यात, खाजगी क्षेत्राला युपीए सरकारने खूप आधीच सामावून घेतलं होतं. संगणकीकरणात भारतातील खाजगी क्षेत्रात आज जे तंत्रज्ञान आणि टॅलेंट आहे ते संरक्षण खात्याकडे नाही. गेल्या 15 वर्षांत खाजगी क्षेत्राने फार मोठं काम संरक्षण उत्पादनात केलं आहे. कुठलाही गाजावाजा न करता किंवा त्याची दवंडी न पिटता डॉ. मनमोहनसिंग यांनी या तंत्र –ज्ञानाचा भारताच्या शस्त्रसिद्धतेसाठी खूप चांगला वापर करून घेतला. त्यामागे राजकीय इच्छाशक्ती आणि त्यावेळच्या केंद्र सरकारचे पक्क धोरण होतं. एनडीए सरकार आणखी पुढचं पाऊल उचलेल अशी अपेक्षा होती. उदाहरणार्थ, संरक्षण आणि संरक्षण उत्पादन ही दोन वेगळी खाती करायला हवी होती. उत्पादन खात्यात सरकारी बाबू नको. कालपर्यंत पशुपालन विभागाचा सचिव असलेल्या माणसाला संरक्षण उत्पादनाच्या गरजा कशा समजतील? सबब, तिथे निवृत्त लष्करी अधिकारी हवे. तथापि, असा एकही धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतलेला नाही.

नवनव्या घोषणा आणि पोकळ बाता एवढच काम या सरकारने चार वर्षांत केले आहे.भाजपा सरकारला धोरण लकवा झाला आहे. त्याच्या फेकुगिरीबद्दल सर्वसामान्य जनता खवळली आहे, हे लोकांच्यात वावरल्यानंतर मला दिसत होतं. पण कपिल काक यांच्यासारखे ज्येष्ठ लष्करी अधिकारी आता मोदी यांचे जाहीर वाभाडे काढतायत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. पाकिस्तानी सीमेवरून "दो के बदले दस" मुंडकी का आली नाहीत; उलट पाकीस्तानची साखर भारतात कशी आली ? हे कोडं सुटायला कपिल काक यांच्या लेखामुळे मदत होईल अशी उपरोधिक टीका थोरात यांनी मोदी सरकारवर केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज