अ‍ॅपशहर

लाखात एक गाय, दिला तीन वासरांना जन्म

अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतकऱ्याच्या डांगी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही वासरे धडधाकट आहेत. एकाचवेळी तीन वासरांना गाईने जन्म देणं ही लाखात एखादी घटना ...

महाराष्ट्र टाइम्स 16 Sep 2018, 3:08 pm
अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akole-cow


अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतकऱ्याच्या डांगी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही वासरे धडधाकट आहेत. एकाचवेळी तीन वासरांना गाईने जन्म देणं ही लाखात एखादी घटना असल्याचं तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष वाकचौरे यांनी सांगितलं.

काळू भांगरे यांनी आपल्या डांगी जातीच्या गाईस बायफच्या मदतीने कृत्रीम रेतन पद्धतीने रेतन केले होते. यासाठी बायफने आपल्या डांगी वळूचे गोठीत वीर्य वापरले होते. बायफचेच पशुधन पर्यवेक्षक सुनील सदगीर यांनी हे कृत्रीम रेतन केले होते. गर्भधारणा वाढीस लागल्यानंतर बायफचे डॉ. सदगीर वेळोवेळी या गायीची तपासणी करत होते. दिवस पूर्ण झाल्यानंतर या डांगी जातीच्या गाईने तीन वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला. आजपर्यंत गाईने दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तीन वासरांना जन्म देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही गाय दोन्ही वेळेस एकूण पाच लिटर दूध देते. यामुळे जन्मलेल्या तिन्ही गोऱ्ह्यांना याचा फायदा होणार असल्याचं शेतकरी भांगरे यांनी सांगितलं. आमच्या आदिवासी भागात गाईला तिळे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं भांगरे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज