अ‍ॅपशहर

गंजबाजारातील दोन गाळे ताब्यात

गंजबाजारातील जुन्या फ्रुट मार्केटमध्ये असलेले दोन गाळे व त्यामागील भाग महापालिकेने शुक्रवारी ताब्यात घेतला.

Maharashtra Times 28 May 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम custody of two shop
गंजबाजारातील दोन गाळे ताब्यात

गंजबाजारातील जुन्या फ्रुट मार्केटमध्ये असलेले दोन गाळे व त्यामागील भाग महापालिकेने शुक्रवारी ताब्यात घेतला. येथील व्यावसायिकांनी मनपाशी कोणताही करार न करता तसेच मनपाकडे कोणतेही भाडे न भरता येथे व्यवसाय सुरू ठेवले असल्याने या व्यावसायिकांना येथून हटविण्यात आले. या कारवाईच्या वेळी चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान, या गाळ्यांसह त्यापाठीमागील जागेत बाजारपेठेत येणाऱ्यांच्या महिलांसाठी स्वच्छतागृह करण्यात येणार आहे.
गंजबाजारातील भाजीमंडईच्या शेजारी मनपाचे जुने फ्रुट मार्केट आहे. नगरला नगरपालिका असताना सुमारे ३५ वर्षांपूर्वी हे मार्केट बांधले गेल्याचे सांगितले जाते. या मार्केटच्या वरच्या मजल्यावर लाड सुवर्णकार पतसंस्थेचे कार्यालय आहे तर खालच्या बाजूस रस्त्याच्या दिशेने दोन फळ विक्रेते व त्यांच्या मागच्या बाजूस पडीक जागा आहे. तिला बाहेरून पत्रेही लावण्यात आले होते. या मागच्या भागात इमारतीचे बांधकामही अर्धवट आहे. येथे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन महापौर सुरेखा कदम यांनी केले आहे. त्यामुळे या जागेची व तेथील व्यावसायिकांची माहिती घेतली असता यापैकी कोणीही मनपाशी भाडेकरार न करता व कोणतेही भाडे न भरता बेकायदा व्यावसायिक वापर करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम दुपारी राबविण्यात आली. मार्केट विभाग प्रमुख कैलास भोसले व अन्य यावेळी उपस्थित होते. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पाठीमागील पडीक बाजूचे पत्रे काढण्यास फारशी अडचण आली नाही, पण रस्त्याच्या बाजूच्या गाळेधारकांना हटविण्याची कारवाई करताना येथे वाद व भांडणे झाली. संबंधित व्यावसायिकांनी कारवाईस विरोध केला. पण चार दिवसांपूर्वी सूचना दिल्या होत्या व त्याआधी नोटिसाही दिल्या होत्या, असे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर येथील साहित्य हटविण्यास मुदत देण्याचीही मागणी केली गेली. पण तिलाही नकार दिला गेला. काही राजकीय नेतेमंडळींनीही ही कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तिलाही न जुमानता सायंकाळी ही कारवाई पूर्ण करून दोन्ही गाळे व त्यामागील जागा मनपाच्या ताब्यात घेण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज