अ‍ॅपशहर

रेडीमेड फराळाला पसंती

घरोघरी चिवडा, लाडू, करंजी असा दिवाळीचा फराळ तयार करण्याचे काम सुरू असते. मात्र, रोजच्या धावपळीने घरी फराळ बनवणे शक्य नसल्यामुळे अनेक महिला बाजारातून रेडिमेड फराळ खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

Maharashtra Times 12 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand for redimade diwali snaks
रेडीमेड फराळाला पसंती


लवंग शेव, लसूण शेव, पालक शेव, टमाटर शेव, मसाला शेव, अशा विविध नमकीन शेव.... जोधपुरी चिवडा, खट्टा-मिठा, मका चिवडा, क्रांती चिवडा, पातळ पोहे असे विविध प्रकारांतील चिवडे... आणि या सर्वांच्या जोडीला शंकरपाळे, करंजी, बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू, अनारसे, मिक्स मिठाई, बालुशाही, चिरोटे, मिठ्ठी पापडी, चना डाळ... अशा एकाहून एक सरस पदार्थांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. दीपोत्सवाचा हा गोडवा वाढवणारा रुचकर फराळ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून किमतीही सामान्यांच्या आवाक्यात आहेत.

दिवाळी सणामध्ये फराळाला विशेष महत्त्व असते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्यांना फराळ देणे, आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना फराळाचे ताट पाठवण्यास दिवाळीत प्राधान्य दिले जाते. त्यामुळे घरोघरी चिवडा, लाडू, करंजी असा दिवाळीचा फराळ तयार करण्याचे काम सुरू असते. मात्र, रोजच्या धावपळीने घरी फराळ बनवणे शक्य नसल्यामुळे अनेक महिला बाजारातून रेडिमेड फराळ खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अवघ्या सहा दिवसांवर दिवाळी आली असल्याने शहरातील कोठी रस्ता, नवी पेठ, कापड बाजार, दिल्लीगेट, चितळे रोड अशा विविध भागांमध्ये रेडिमेड फराळाचे स्टॉल सजले आहेत. याठिकाणी चिवडा, शेव, लाडू यांच्या विविध प्रकारांसोबतच करंजी, शंकरपाळे, चकली असा दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय अनारसे पीठ व चकली पीठदेखील विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांच्याही किमती आवाक्यात असल्याने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे.

सणाचा आनंद घेण्यास वेळ हवा

‘दिवाळीमध्ये घरातील सर्वांनाच सुट्टी असते. परंतु, याकाळात घरातील महिला या फराळाचे साहित्य करीत बसल्यास त्यांना घरातील इतरांसोबत गप्पा मारण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी वेळ राहणार नाही. त्यामुळेच दिवाळीच्या काळात रेडिमेड फराळ खरेदी करण्यास प्राधान्य देतो,’ असे ग्राहक उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले. ‘सणाचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी रेडिमेड फराळ परवडत आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

कौट ः

घरामध्ये फराळ करण्याचे काम करणे महिलांना रोजच्या धावपळीतून शक्य होत नाही. तसेच फराळाचे साहित्य घेणे व त्यानंतर फराळ तयार करणे, यासाठी जेवढा वेळ जातो, त्याऐवजी रेडिमेड फराळ घेणे परवडत आहे. फराळ करण्यासाठी जाणारा वेळ हा आपला कुटुंबाला देता येतो. त्यामुळे रेडिमेड फराळ खरेदी करण्यास माझी पसंती असते.

- रेखा सारडा, ग्राहक

कोट ः

दिवाळी फराळातील ४३ प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांतून फराळ खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात. दिवाळी उत्सवासाठी आता नवीन कपडे, नवीन वस्तू घेण्यासोबतच रेडिमेड फराळ घेण्याची पद्धत रुढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- हेमराज बोरा, विक्रेते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज