अ‍ॅपशहर

कर्जमाफीचे पैसे खात्यावर

राज्य सरकारची बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-कर्जमाफी आता अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ७३९ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

Maharashtra Times 13 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dept amount in farmers bank account
कर्जमाफीचे पैसे खात्यावर

राज्य सरकारची बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-कर्जमाफी आता अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ७३९ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा सहकारी बँकेने १ लाख २३ हजार ७८९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ३७५ कोटी ८३ लाखाची रक्कम जमाही केली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात टप्प्या टप्प्याने पैसे जमा करण्यात येणार आहेत.

मागील जुलै महिन्यापासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. सरकारने ऑनलाइन अर्ज दाखल करवून घेण्यासह गाव पातळीवरील सेवा संस्थांतील गटसचिवांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती संकलित केली होती. शेतकऱ्यांचे अर्ज तसेच गटसचिवांद्वारे भरल्या गेलेल्या माहितीची तपासणी सुरुवातीला राज्यस्तरावर करण्याचा प्रयत्न झाला, पण तांत्रिक अडचणी, याद्यांतील चुकांची दुरुस्ती व अन्य काही कारणाने विलंब होत असल्याने अखेर जिल्हास्तरावरच जिल्हा बँकेद्वारे याद्यांची तपासणी केली गेली व ती अंतिम झालेली यादी शासनाकडे पाठवल्यानंतर आता शासनाने याच याद्या पुन्हा तपासून अंतिम करण्याचे काम टप्प्य़ा टप्प्याने सुरू केले आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ७३९ शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असल्याचे निश्चित झाले आहे. यापैकी १ लाख २ हजार २४८ शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची माफी मिळणार आहे तर १ लाख ३ हजार ४१० शेतकऱ्यांना कमीतकमी १५ ते जास्तीतजास्त २५ हजारापर्यंत प्रोत्साहनात्मक अनुदान मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड वेळीच केली असल्याने त्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तसेच दीड लाखावर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समायोजन (वन टाइम सेटलमेंट) योजना असून, या शेतकऱ्यांनी येत्या ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या मुदतीत त्यांच्या कर्ज थकबाकीपैकी दीड लाखावरील रक्कम एकाचवेळी भरली तर त्यांना दीड लाखाच्या माफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यादृष्टीने आता जिल्हा बँक, महसूल व सहकार खात्याने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. असे जिल्ह्यात ३५ हजार ८१ शेतकरी आहेत.

जिल्हा बँकेची आघाडी

नगर जिल्हा सहकारी बँकेने दीड लाखावर कर्जमाफी मिळणाऱ्या ५६ हजार ६४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २७३ कोटी १० लाख रुपये आतापर्यंत जमा केले आहेत. याशिवाय प्रोत्साहन अनुदान मिळण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचीही तपासणी करून आतापर्यंत अशा ६७ हजार ७२५ शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी ७३ लाखाची रक्कम जमा केली आहे. हे दोन्ही मिळून १ लाख २३ हजार ७८९ शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने आतापर्यंत ३७५ कोटी ८३ लाखाचा कर्जमाफी लाभ दिला आहे. या रकमा संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा दाखवल्या गेल्या आहेत. या निमित्ताने बँकेची एवढ्या थकीत रकमेची वसुलीही झाली आहे. अनेक जुनी कर्ज खातीही यातून आता निकाली निघाली आहेत. सध्या विधानसभेचे नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने व कर्जमाफीसंदर्भातील कार्यवाहीची रोज माहिती मागितली जात असल्याने जिल्हा बँक व सहकार खात्याच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्हा बँकेतील अधिकारी व कर्मचारी तर रात्र रात्र जागून कर्जमाफीची प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य देत आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांचेही काम सुरू
शेतकरी कर्जमाफी योजनेत राष्ट्रीयीकृत बँकांचाही सहभाग असल्याने त्यांच्या स्तरावरही माफीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या कर्जखाती सुमारे ७७ कोटीची दीड लाखाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत योग्य ती रक्कम जमा केल्याचे सांगितले जाते. प्रोत्साहन अनुदानाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र या बँकांद्वारे अद्याप प्रोत्साहन अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज