अ‍ॅपशहर

चार वर्षांत सव्वाशे गावांत साथरोग

जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या काळात १२३ गावांत साथरोगांचा उद्रेक झाला आहे.

Maharashtra Times 21 Jun 2016, 9:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diseases in 123 villages
चार वर्षांत सव्वाशे गावांत साथरोग


साथरोगांच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, कावीळ, गॅस्ट्रो, चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या आजारांच्या साथी फैलावत आहेत. जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या काळात १२३ गावांत साथरोगांचा उद्रेक झाला आहे. यामध्ये काही गावांमध्ये सातत्याने साथरोगांची लागण झाली आहे. सध्या पावसास सुरुवात झाल्यामुळे साथीचे आजार उद्भवणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून चोवीस तास साथरोग नियंत्रण पथक कार्यरत ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

पावसाळ्याच्या दिवसांत साथीच्या आजारांचे पेशंट आढळत असतात. या काळात दूषित पाण्याचा पुरवठा, परिसरात पाणी साचणे यांसारख्या कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढत जाते. या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी काही गावांत साथरोग वारंवार उद्भवत आहेत. पावसाळ्यामध्ये नागरिकांना आवाहन करूनही त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानेही ही समस्या वाढत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चालू वर्षातही आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणाचा आराखडा तयार केला आहे. सातत्याने साथरोग उद्भवणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला आहे. साथरोग नियंत्रण पथके तयार केली आहेत. साथरोगांचे रुग्ण आढळल्यास संबंधित गावात जाऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना या पथकांना दिल्या आहेत.

डेंगीचा सर्वाधिक उद्रेक
जिल्ह्यात मागील चार वर्षात डेंगी या आजाराचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील जवळपास ४६ गावांत डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ३३ गावांत ताप, ६ गावांत अतिसार, ७ गावांत हिवताप, ४ गावांत गॅस्ट्रो, २ गावांत काविळ, ९ गावांत चिकुनगुण्या, ११ गावांत गोवर, तसेच २ गावांत कांजण्यांचे रुग्ण आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

साथरोग उद्भवू शकणाऱ्या गावांवर लक्ष आहे. उपचाराची व्यवस्था आहे. नियंत्रण पथकेही कार्यरत आहेत. आरोग्य केंद्रांना औषधांचे किट दिले आहेत.
– डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज