अ‍ॅपशहर

शिवसेनेतील खदखद खालच्या स्तरापर्यंत, नगरसेवकाचे संपर्कप्रमुखावर गंभीर आरोप

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडत आहे. आता या दुफळीमुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष या निमित्ताने बाहेर येत आहे. शिवसेनेतील पदाधिकारी आणि नेते एकमेकांवर आरोप करत आहेत.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स 24 Jun 2022, 8:11 pm
अहमदनगर : राज्यात शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष आणि खदखद आता खालच्या स्तरापर्यंत येऊन पोहोचली आहे. नगरमधील नगरसेवकाने नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा व्यक्त करताना जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे नगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनरही शहरात लावले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde rebel shiv sena corporator allegations
शिवसेनेतील खदखद खालच्या स्तरापर्यंत, नगरसेवकाचे संपर्कप्रमुखावर गंभीर आरोप


एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. तर दुसऱ्या बाजूने शिंदे यांच्यावरही टीका सुरू आहे. यामध्ये राज्यात दोन गट पडले आहे. एक ठाकरेंच्या तर दुसरा शिंदेच्या पाठीशी आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधील शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी नगरचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यावर टीका केली आहे. कोरगावकर यांनी नगरमध्ये शिवसेनेचे नुकसान केले. माजी आमदार, दिवंगत नेते अनिल राठोड यांना कोरगावकर यांनी खूप त्रास दिला, असा आरोप करून आणखी काही गोष्टी लवकरच जाहीर करणार असल्याचेही सांगितले. आम्ही गद्दार नाहीत, औरंगाबादचे संजय शिरसाठ यांनी लिहिलेले पत्र योग्यच आहे, असेही आढाव यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे जिल्ह्याचे शिवसेनेचे उपप्रमुख गिरीष जाधव यांनी ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनर नगर शहरात लावले आहेत. ‘काळ कसोटीचा आहे, पण संघर्ष आम्हाला नवीन नाही’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या समवेत आम्ही आहोत, असे फलक शहरामध्ये चौकाचौकांमध्ये लावण्यात आले आहेत. आम्ही ठाकरे यांच्यासोबत कायम राहू. आज रात्री शिवसैनिकांची बैठक घेणार आहोत. ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आणखी काय करता येईल, त्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेला पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख सध्या कुठे आहेत?; समोर आलं कारण

नगरमध्ये शिवसेनेत आधीच दोन गट आहे. एक गट दिवगंत नेते अनिल राठोड यांना मानणारा आहे. त्यांच्या निधनानंतर एक गट स्वतंत्र असून त्याची राष्ट्रवादीशी जवळीक असल्याचे सांगण्यात येते. राठोड यांचा गट ठाकरे यांच्यासोबत ठाम आहे. तर दुसरा गट द्विधा मनस्थितीत आहे. एकनाथ शिंदे यांनी नगर शहराच्या कामात आणि राजकारणातही मदत केली असल्याने कोणतीच उघड भूमिका घेता येत नसल्याचे त्यातील पदाधिकारी खासगीत सांगत आहेत.

सरकार अस्थिर झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली, आता बदल्यांचे काय होणार?
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज