नगर : 'वडील राधाकृष्ण विखे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. प्रतिस्पर्धी 'राष्ट्रवादी'चा उमेदवार व्यक्तिगत टीका करीत असल्याने मुलगा म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत,' असे स्पष्टीकरण भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिले. राधाकृष्ण विखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत डॉ. विखे यांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही. पण कोणत्या कारणाने ते आपल्या प्रचारात आहे, हे मात्र आवर्जून सांगितले. 'ते काँग्रेसमध्येच आहेत. मी भाजपमध्ये आल्यापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. पण मी भाजपमध्ये येण्याची कारणे सर्वांनाच कळली आहेत. शिवाय या परिवारानेही मला स्वीकारले आहे व उमेदवारी दिल्याचा आनंद आहे,' असे सांगून डॉ. विखे म्हणाले, 'विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे वडिलांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यावरून वैयक्तिक पातळीवर प्रतिस्पर्ध्यांकडून टीकाटिप्पणी होत आहे. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनीही (जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे) मुलगा म्हणून माझ्या मागे उभे राहण्याचे ठरवले आहे.'
...........