अ‍ॅपशहर

शाळेसाठी ‘लिफ्ट’वर भरवसा

​ विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीत एसटी प्रवास पास देण्याची व्यवस्था आहे. परंतु, त्यानंतरही खराब रस्ते व वेळेवर एसटी येत नसल्यामुळे ग्रामीण भागासह महामार्गावरील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास हा दुसऱ्याने दिलेल्या 'लिफ्ट'च्या भरवशावर सुरू आहे.

Maharashtra Times 26 Jul 2017, 3:00 am
नगर ः सरकारी धोरणानुसार विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरात एसटी प्रवास पास देण्याची व्यवस्था आहे. परंतु, त्यानंतरही खराब रस्ते व वेळेवर एसटी येत नसल्यामुळे ग्रामीण भागासह महामार्गावरील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास हा दुसऱ्याने दिलेल्या 'लिफ्ट'च्या भरवशावर सुरू आहे. महामार्गाने जाणाऱ्या जलदगतीच्या बस शाळेच्या वेळेत असल्या तरी त्या अनेक गावांमध्ये थांबत नसल्याने विद्यार्थ्यांन सायकल किंवा खासगी वाहनांचा शाळेत जाण्यासाठी उपयोग करावा लागतोय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम for school students depend on lift
शाळेसाठी ‘लिफ्ट’वर भरवसा


मागील आठवड्यात मांडवे येथून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिनीला लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केला. यानिमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्षात रोज नगर शहरामध्ये येणाऱ्या नगर-सोलापूर, नगर-कल्याण, नगर-पाथर्डी, नगर-पुणे अशा महामार्गांवर सुद्धा एसटी बस सोडून खासगी वाहनांना हात करीत थांबणारी मुले, चार ते पाच किमी सायकलवर प्रवास करून शाळेला जाणारी मुले दिसतात. काही गावांमध्ये बसला थांबा नाही, काही ठिकाणी बस वेळेवर नाही, तर कोणी गर्दीमुळे गाडीच थांबवत नाही, असेच चित्र महामार्गांवर दिसते.

नगर तालुक्याचा विचार केल्यास शिक्षण विभागातून मिळालेल्या आकडेवारीनुसार मनपा क्षेत्र वगळता नगर तालुक्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या १३७ शाळांमध्ये जवळपास ३२ हजार ५६० विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये रुईछत्तीशी, टाकळी खातगाव, वाळकी, अशा प्रमुख मार्गांवर असणाऱ्या गावांतील शाळांचा समावेश आहे. तर, शाळकरी मुलीवर बलात्काराची घटना झालेल्या पाथर्डी तालुक्यामध्ये तिसगाव व करंजी येथील शाळासुद्धा महामार्गावर आहेत. या सर्वच शाळांमध्ये महामार्गावर असणाऱ्या छोट्यामोठ्या वस्तीतून व गावातून विद्यार्थी येतात. वेळेवर शाळेत जाता यावे, यासाठी वाहनांच्या शोधामध्ये अनेक विद्यार्थी शाळा भरण्याच्या वेळपूर्वीच दीड ते दोन तास महामार्गावर येऊन थांबतात. सकाळच्या वेळेला महामार्गावर दहा ते पंधरा मिनिटांनी एक तरी बस जात असते. यापैकी बहुतांश जलदगती बस असल्यामुळे त्यांना प्रत्येक छोट्या गावात थांबणे शक्य होत नाही. त्यामुळेच विद्यार्थी वेळेवर शाळेत जाण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या खासगी वाहनाला हात करून त्यांना लिफ्ट मागतात.

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी विविध उपक्रम सरकारतर्फे राबवले जातात. विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये एसटीचा पास देण्यात येतोय. परंतु, शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना बसची सुविधाही मिळणे गरजेचे आहे.

कोट ः

शाळेत विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटी आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुरळीत होईल. ज्या गावांमध्ये एसटी सुरू करण्यात तांत्रिक अडचणी आहेत, अशा गावांतील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची सोय करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था यांनी पुढे येण्याची गरज असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.

कोट ः

जलदगती बसला पन्नास किमीचा थांबा असल्यामुळे त्या प्रत्येक गावात थांबत नाहीत. तर जिल्ह्याअंतर्गत असणाऱ्या गाड्यासुद्धा प्रत्येक वाड्यावस्तीवर अथवा छोट्या गावात न थांबता जेथून थेट प्रवासी मिळण्याची शक्यता जास्त आहे, तेथे थांबतात. ज्या रस्त्यांवर शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी एसटी बस सोडण्यात येतात परंतु, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची अंदाजे २५ टक्के कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक मार्गावर शाळेच्या वेळेत गाडी सोडणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांची समस्या सुटली तर नक्कीच यामधून मार्ग निघेल.

- एम. यू. कोल्हे, प्रभारी विभाग नियंत्रक, एसटी

- लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज