अ‍ॅपशहर

ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाची चिंता

तिसगाव (ता.पाथर्डी) येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची धास्ती परिसरातील विद्यार्थिनी आणि पालकांनी घेतली असून शाळांतील मुलींची उपस्थिती घटल्याचे सोमवारी आढळून आले. काहींनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित पर्याय म्हणून शाळेची सोय असलेल्या ठिकाणच्या नातेवाइकांचाही शोध सुरू केला आहे. सोय नाही, म्हणून पूर्वी काही मुलींचे शिक्षण थांबल्याची उदाहरणेही गावात आहेत.

संदीप कुलकर्णी | Maharashtra Times 25 Jul 2017, 3:00 am
नगर:तिसगाव (ता.पाथर्डी) येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची धास्ती परिसरातील विद्यार्थिनी आणि पालकांनी घेतली असून शाळांतील मुलींची उपस्थिती घटल्याचे सोमवारी आढळून आले. काहींनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित पर्याय म्हणून शाळेची सोय असलेल्या ठिकाणच्या नातेवाइकांचाही शोध सुरू केला आहे. सोय नाही, म्हणून पूर्वी काही मुलींचे शिक्षण थांबल्याची उदाहरणेही गावात आहेत. दरम्यान, पालक आणि विद्यार्थिंनीच्या मनातील भीती काढण्यासाठी शाळा आणि शिक्षण विभागाने पालक सभा घेतल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम girls scared to going school
ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाची चिंता


गेल्या आठवड्यात मांडवे येथून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिनीला लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केला. यातील आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा तिसगावमधील शाळांतील मुलींची उपस्थिती घटल्याचे आढळले. पीडित मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेमध्ये ३१० विद्यार्थी व विद्यार्थिंनी शिक्षण घेतात. यापैकी दररोज साधारणपणे १५ ते २० विद्यार्थी गैरहजर असतात. परंतु घटनेनंतर गेल्या दोन दिवसांमध्ये गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण ६० च्या आसपास गेल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले. मांडवे गावात हायस्कूलच्या शिक्षणाची सोय नसल्याने बहुतांश मुलींचे शिक्षण थांबत असल्याचे आढळले. परिस्थितीवर मात करून ज्या काही मुली शाळेत जात आहेत, त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. प्रवासाच्या साधनाची सोय नसलेल्या गावातील अनेक मुलींनाही त्यांच्या पालकांनी शाळेत पाठविणे टाळले.

मांडवा गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यानंतर येथील मुलींना शिक्षण घेण्यासाठी तिसगाव येथे जावे लागते. गावामध्ये गेल्या सात वर्षांपासून एसटी येत नसल्याने येथील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायी किंवा सायकलचा उपयोग करावा लागतो. शाळेला उशीर होऊ नये, म्हणून काही जण रस्त्याने तिसगावच्या दिशेने जाणाऱ्या इतर वाहनांचा आधार घेतात.

गावातील वयोवृद्ध महिला रमा चंदनशिव म्हणाल्या की, ‘ती वाईट घटना घडल्यापासून अनेक मुली शाळेत जात नाहीत. माझी नात सुद्धा या घटनेनंतर भेदरली आहे. शाळेत जाण्यासाठी सोय नसल्यामुळे मुलींना शिकवावे कसे, असाच प्रश्न पडला आहे.’ सुमन सरोदे म्हणाल्या, ‘गावातून सुरक्षित शाळेला जाण्याची सोय होणार नसेल तर मुलींचे शिक्षण थांबविणे किंवा शाळेची सोय असलेल्या ठिकाणच्या नातेवाईकांकडे त्यांना पाठविणे, हे पर्याय आता आमच्यासमोर आहेत.’

लैला शेख म्हणाल्या, ‘शाळेत जायची सोय नसल्याने मुलीचे शिक्षण थांबवून तिचे लग्न करून देण्याची वेळ आली. अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी गावात दहावीपर्यंत शाळा सुरू करण्याची गरज आहे.’ एसटीचा पास मिळतो, पण एसटीच नाही. शिक्षण मोफत असले तरी शाळेची वाट सुरक्षित नाही. अशा पेचात केवळ मांडवेच नव्हे, तर शाळेची सोय नसलेली कित्येक गावे आहेत.

पूर्वी होती सातवीपर्यंत शाळा

मांडवे गावामध्ये सध्या जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. तेथे ६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वी हीच शाळा सातवीपर्यंत होती, नंतर धोरणात्मक बदल झाला आणि शाळा चौथीपर्यंत झाली. त्यामुळे तेथून पुढे शिक्षण घेण्यासाठी तिसगावला जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. सातवीपर्यंतची शाळा गावामध्ये सुरू असती, तर हा प्रकार घडलाच नसता अशीही चर्चा गावात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज