अ‍ॅपशहर

‘अपंग पुनर्वसन केंद्र’ मार्गी

अपंगांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरमध्ये अपंग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतरही जागेअभावी या केंद्राचा प्रश्न तब्बल पाच वर्षांपासून रखडला होता.

Maharashtra Times 23 Nov 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम handicapped rehabilitation center
‘अपंग पुनर्वसन केंद्र’ मार्गी

अपंगांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरमध्ये अपंग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतरही जागेअभावी या केंद्राचा प्रश्न तब्बल पाच वर्षांपासून रखडला होता. अखेर हा प्रश्न मार्गी लागला असून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचा नाद सोडून नवी जागा शोधली आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील नगर पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयांच्या परिसरातील जागेवर हे केंद्र उभारले जाणार आहे.
केंद्राच्या जागेसाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर सि‌व्हिल हॉस्पिटलने जागा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, आता मात्र सिव्हिलकडून प्रतिसाद मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिलचा नाद सोडला आहे. समाजकल्याण विभागाने केंद्राच्या बांधकामासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद केली असून कामाचे अंदाजपत्रक तयार करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र पाठवले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अपंग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची घोषणा २०१२ मध्येच झाली होती. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने जागा निश्चित करुन काम सुरू करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतरही नगर शहरात एकाही ठिकाणी जागा मिळू शकली नाही. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात जागा देण्यासाठी सिव्हिलकडे पाठपुरावा करण्यात आला. सिव्हिलकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हॉस्पिटलच्या आवारात जागा दिली जाणार होती. पुढे मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष झाले. सिव्हिल हॉस्पिटलने जागा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे निधी असतानाही केवळ सरकारी पातळीवरील उदासीन कारभारामुळे केंद्र प्रत्यक्षात येऊ शकले नाही. केंद्रअभावी अपंगांची होणारी परवडही थांबली नाही.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने केंद्र सुरू करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे. जागेसाठी सिव्हिलकडे पाठपुरावा केला होता. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून नवी जागा शोधली आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील नगर पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयांच्या परिसरात जागा मिळाली आहे. येथील जागेवर केंद्र सुरू करण्यासाठी पन्नास लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. केंद्राचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. कामाचे अंदाजपत्रक मात्र तयार झालेले नाही. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी बांधकाम विभागास पत्र पाठवले आहे. केंद्राचे बरेचसे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाले आहेत. निधीचीही तजवीज झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून रखडलेले अपंग पुनर्वसन केंद्र लवकर सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज