अ‍ॅपशहर

आदर्श गाव योजना रखडली

प्रत्यक्षात आदर्श ग्राम योजनेबाबत आमदारांनी दाखविलेला निरुत्साह, इतर अडचणींमुळे कार्यवाही वेगात न झाल्याने ही योजना कागदावरच राहिली आहे.

Maharashtra Times 27 Apr 2017, 3:04 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ideal village scheme
आदर्श गाव योजना रखडली


केंद्र सरकारच्या खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातील ग्रामपंचायती आदर्श ग्राम करण्यासाठी आमदार ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षे होत आली आहेत. परंतु, प्रत्यक्षात आदर्श ग्राम योजनेबाबत आमदारांनी दाखविलेला निरुत्साह, इतर अडचणींमुळे कार्यवाही वेगात न झाल्याने ही योजना कागदावरच राहिली आहे. सध्या या योजनेतील जिल्ह्यातील १५ गावांचे सर्वेक्षण सुरूच असून, त्यानंतर आराखडे तयार करून ते मंजूर करून विकासकामे सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

केंद्र सरकारने प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील गावे आदर्श करण्यासाठी सांसद आदर्श ग्राम योजना सुरू केली आहे. याच पद्धतीने राज्यात ग्रामविकास विभागाने आदर्श आमदार ग्राम योजना आणली होती. ही योजना राबविण्याचा निर्णय २०१५ मध्येच झाला होता. परंतु, ही योजना कशी राबवायची याबाबत आदेश निघाला नव्हता. काही महिन्यानी हा आदेश निघाल्यानंतर आमदारांनी गावे निवडण्यास सुरुवात केली होती. एका आमदाराला मतदारसंघातील एक गाव निवडायचे होते. परंतु, गावे निवडण्यासाठी आमदारांनी अनेक महिने घेतले. काही आमदारांचा मतदारसंघ तीन, दोन तालुक्यांचे मिळून असल्याने कोणत्या तालुक्यातील गाव निवडायचे, असे प्रश्न आमदारांना पडला होता. काही आमदारांनी गावे निवडण्यासाठी चार ते सहा महिने लावले होते. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतील सदस्यांनी प्रत्येकी एक व दोन विधान परिषदेतील सदस्यांनी दोन गावे अशी १४ गावे निवडण्यात आली होते. मुंबई येथील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी नगर जिल्ह्यातील गाव निवडले. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेसाठी १५ गावांची निवड झाली होती.

ही गावे निवडल्यानंतर यासाठी वेगळा निधी मिळणार नाही, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. आमदार निधी व इतर योजनांच्या निधीतून या गावात विकास कामे करायची होती. त्यासाठी सुरुवातीला आदर्श गाव होण्यासाठी सर्वेक्षण करून, आराखडा तयार करून तो सरकारकडून मंजूर करून घ्यायचा आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी निधीची अडचण निर्माण झाली होती. गेल्या महिन्यात यासाठी निवडलेल्या एका गावाच्या सर्वेक्षणासाठी ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार गावातील रस्ते, शाळा, अंगणवाडी, कुटुंब सर्वेक्षणाची माहिती जमा केली जात आहे. ही माहिती जमा केल्यानंतर गावाचा आराखडा तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार केल्यानंतर त्याला मंजुरी मिळून गावात कामे केली जाणार आहेत. गावे निवडून आराखडे तयार करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी गेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आदर्श गावे होण्यासाठी किती वर्षे लागतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज