अ‍ॅपशहर

कोपर्डीचा आज निकाल

राज्यभर गाजलेल्या कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून खटल्याच्या निकालासाठी शनिवारी (१८ नोव्हेंबर) सुनावणी ठेवण्यात आली आहे. या खटल्याच्या निकालासाठी न्यायालयात गर्दी होणार असल्याने न्यायालयाच्या आवारात चोख बंदोबस्त असून, जिल्ह्यात दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.

Maharashtra Times 18 Nov 2017, 3:54 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kopardi verdict today
कोपर्डीचा आज निकाल


राज्यभर गाजलेल्या कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून खटल्याच्या निकालासाठी शनिवारी (१८ नोव्हेंबर) सुनावणी ठेवण्यात आली आहे. या खटल्याच्या निकालासाठी न्यायालयात गर्दी होणार असल्याने न्यायालयाच्या आवारात चोख बंदोबस्त असून, जिल्ह्यात दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. गेल्या गुरुवारीच या खटल्याचे अंतिम युक्तिवादाचे कामकाज पूर्ण झाले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाकडून ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला आहे. या खटल्यात तिन्ही आरोपींविरुद्ध २४ वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे असल्याचा अंतिम युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. निकम यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर १५ जुलै २०१६ रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर १६ जुलै रोजी संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या दोघांना अटक झाली होती.

या खटल्याचा निकाल शनिवारी लागणार असून, या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. या खटल्यासाठी न्यायालयाच्या आवारात दोन स्ट्रायकिंग फोर्स व ७० पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त असणार आहे. घटना घडलेल्या कोपर्डी गावात ५० पोलिस कर्मचारी व स्टायकिंग फोर्स असणार असून, जिल्ह्यात दक्षता घेण्यात आली आहे.

निकाल एेकण्यासाठी ध्वनीवर्धक

या खटल्याचा निकाल एेकण्यासाठी न्यायालयात गर्दी होणार असल्याचे गृहित धरून न्यायालयाकडून निकाल ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या आवारात दोन ध्वनीवर्धक लावण्यात आले असल्याची माहिती न्यायालयाच्या प्रशासनाकडून मिळाली आहे. न्यायालयाच्या आवारात स्पीकर लावावेत, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. नवीन न्यायालयात पहिल्यादांच या खटल्यासाठी ध्वनीवर्धक लावण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज