अ‍ॅपशहर

नगरमध्ये मोफत 'शिवभोजन'वर उड्या, थाळ्या वाढविण्याची वेळ

राज्य सरकारनं सुरू केलेली शिवभोजन थाळी लॉकडाउनमध्ये गरिबांसाठी वरदान ठरली आहे. अनेक ठिकाणी गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत. त्यामुळं नगरमधून थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2021, 4:35 pm
अहमदनगर: ‘ब्रेक दि चेन’चे निर्बंध कडक करताना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेळेआधीच निर्धारित थाळ्या संपल्याने संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर थाळ्या संपल्याने पार्सल घेऊन जाण्यासाठी आलेल्या अनेकांना परत जावे लागले. तर कोठे गर्दी झाल्याने पोलिसांनी कारवाईही केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar


वाचा: 'इतकं सगळं करूनही अजित पवार छातीठोकपणे कसं बोलतात?'

महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची ही योजना सुरू केली आहे. मागील लॉकडाउनच्या काळात ती पाच रुपयांना करण्यात आली. आतापर्यंत ती पाच रुपयांना देण्यात येत होती. मात्र, नव्याने निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून ही थाळी मोफत केली आहे. कडक निर्बंधाच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वाचा: 'इतकं सगळं करूनही अजित पवार छातीठोकपणे कसं बोलतात?'

आज पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे. वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. आज निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.

वाचा: करोना परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या खासदारावर शाई फेकण्याचा प्रयत्न

आज सकाळपासूनच अनेक केंद्रावर रांगा पहायला मिळाल्या. केंद्रात जेवण घेण्याची परवानगी नव्हती. प्रत्येकाला पार्सल देण्यात येत होते. मात्र, काही तासांतच अनेक केंद्रावरील थाळ्यांची क्षमता संपली. काही ठिकाणी माणुसकीच्या नात्याने केंद्र चालकांनी थाळ्या वाटप सुरू ठेवले होते. मात्र, बहुतांश केंद्रावर लवकरच ते बंद झाले. पोलिस या केंद्रांवर लक्ष ठेवून होते. नगर शहरातील चितळे रोडवर एका केंद्रात चालकच विनामास्क वावरत असल्याचे आढळून आल्यावर त्याला दंड करण्यात आला. केंद्रावर पार्सल घेण्यासाठी गर्दी न करण्याच्या आणि नियम पाळण्याच्या सूचना पोलिस करीत होते. अनेक जण पार्सल घरी घेऊन जात होते, तर काही मजुरांनी केंदाच्या जवळपासच जागा शोधून तेथे बसून जेवण घेतल्याचेही पहायला मिळाले.

वाचा: 'ठाकरे सरकार कधी आणि कसं पडणार ते अजित पवारांना माहीत आहे'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज